Sangli: अतिरेक्यांकडून रेकी, चांदोली धरणावर पोलिस बंदोबस्तात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 17:24 IST2023-08-16T16:48:32+5:302023-08-16T17:24:11+5:30
विकास शहा शिराळा : दोन अतिरेक्यांनी चांदोली धरणाची रेकी केल्याची खळबळजनक माहिती समोर आल्याने धरण परिसरात सहा सीसीटीव्ही कॅमेरे ...

Sangli: अतिरेक्यांकडून रेकी, चांदोली धरणावर पोलिस बंदोबस्तात वाढ
विकास शहा
शिराळा : दोन अतिरेक्यांनी चांदोली धरणाची रेकी केल्याची खळबळजनक माहिती समोर आल्याने धरण परिसरात सहा सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. पर्यटक, कामाव्यतिरिक्त जाणारे अधिकारी यांना मज्जाव करण्यात आला आहे.
इसिस नावाच्या (इस्लामिक स्टेटच्या) दहशतवादी संघटनेच्या दोन अतिरेक्यांना पुणे येथे दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक केली होती. या अतिरेकींनी कोल्हापूर येथील महामार्ग नजीकच्या एका गावातील घरात वास्तव्य केले होते व त्यांनी तेथूनच एक दिवस चांदोली धरण परिसरात राहून या धरणाची रेकी केली असल्याची खळबळजनक माहिती विश्वसनीय सूत्राकडून समोर आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रातील क्रमांक दोनच्या या मातीच्या धरणाची दहशतवाद्यांनी कोणत्या उद्देशाने तपासणी केली असेल हे तपासात उघड झालेले नाही. काही दिवसांपूर्वी आंबोली परिसरात झालेल्या स्फोटाचे काही कनेक्शन आहे का? त्यादृष्टीने देखील तपासणी होणे गरजेचे आहे.
चांदोली व परिसरात काही व्यावसायिकांनी रिसॉर्ट व लॉजिंग सुरू केली आहेत. यामध्ये पर्यटक तसेच अनोळखी व्यक्तींना ओळखीचा पुरावा रेकॉर्ड बुकमध्ये नोंद न करता रुम देण्यात येत आहेत. अशामुळे दहशतवाद्यांना येथे मुक्काम केला असण्याची शक्यता आहे.
दहशतवाद्यांकडून चांदोली धरण परिसरात रेकी केल्याचे आढळल्यामुळे धरणावर पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. अनोळखी व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसल्यास ताबडतोब कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीही सतर्क रहावे असे आवाहन सहायक निरीक्षक अविनाश मते यांनी केले आहे.