Sangli Crime: पोलिस भासवून दागिने लुटणाऱ्यास अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:41 IST2025-06-13T17:40:49+5:302025-06-13T17:41:13+5:30

गुन्हे अन्वेषणची कारवाई 

Recorded interstate criminal who robbed jewellery by claiming to be a police officer arrested in Sangli | Sangli Crime: पोलिस भासवून दागिने लुटणाऱ्यास अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sangli Crime: पोलिस भासवून दागिने लुटणाऱ्यास अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलिस असल्याचे सांगून दागिने लुटणाऱ्या रेकॉर्डवरील आंतरराज्य गुन्हेगार कासिम सलीम इराणी (वय २७, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर, पुणे, सध्या रा. जयसिंगपूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सोन्याची साखळी, अंगठी, स्पोर्टस् बाईक असा ६ लाख १५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

दि. ३१ मे रोजी आटपाडी ते भिवघाट रस्त्यावरून नारायण तातोबा चव्हाण-पाटील (वय ७६, रा. यमाजी पाटलाचीवाडी, ता. आटपाडी) हे दुचाकीवरून निघाले होते. तेव्हा दुपारी चारच्या सुमारास दोघांनी त्यांना अडवले. आम्ही पोलिस आहोत, पुढे लुटालूट सुरू आहे. तुमच्याजवळील दागिने काढून खिशात ठेवा असे त्यांनी सांगितले. नारायण पाटील हे सोनसाखळी व अंगठी रूमालात बांधत असताना एकाने मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असे सांगून हातचलाखीने रुमालात दागिने न ठेवता दगड ठेवला. पुढे गेल्यानंतर पाटील यांनी रूमाल बघितल्यानंतर आतमध्ये दगड ठेवल्याचे पाहून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक या गुन्ह्याचा तपास करताना हवालदार सागर लवटे यांना संशयित कासिम इराणी याची माहिती मिळाली. त्याला जयसिंगपूर येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदार अबुजर इराणी (रा. वासन, जि. ठाणे) याच्या मदतीने आटपाडी येथील वृद्धाची सोनसाखळी, अंगठी काढून घेतल्याचे सांगितले. दीड महिन्यापूर्वी जत ते सांगली रस्त्यावर एका वृद्धाला पोलिस असल्याचे सांगून गळ्यातील सोनसाखळी व अंगठी हातचलाखीने काढून घेतल्याची कबुली दिली.

दोघांकडून ६ लाख १५ हजाराचे दागिने व स्पोर्टस् बाईक जप्त केली. त्याला आटपाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, तानाजी सावंत, सहायक निरीक्षक पंकज पवार, अंमलदार सागर लवटे, संदीप गुरव, सतीश माने, नागेश खरात, दऱ्याप्पा बंडगर, अनिल कोळेकर, अमर नरळे, महादेव नागणे, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, संदीप नलावडे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, सुनील जाधव, अभिजीत पाटील, अजित पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

आंतरराज्य गुन्हेगार

कासिम इराणी हा आंतरराज्य गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध कोल्हापूर, पुणे, पश्चिम बंगालमध्ये मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

Web Title: Recorded interstate criminal who robbed jewellery by claiming to be a police officer arrested in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.