Sangli: ‘पोल्ट्री’तील जुगार अड्ड्यावर छापा, ६५ जण ताब्यात; रोकडसह ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 18:18 IST2025-07-14T18:18:32+5:302025-07-14T18:18:47+5:30
कवठेमहांकाळ पोलिसांचा कानाडोळा

Sangli: ‘पोल्ट्री’तील जुगार अड्ड्यावर छापा, ६५ जण ताब्यात; रोकडसह ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरापासून काही अंतरावर नरसिंहगावच्या हद्दीत असलेल्या एका पोल्ट्री शेडमध्ये सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या पथकाने रविवारी रात्री छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी ६५ जणांना ताब्यात घेतले. एकजण पसार झाला आहे.
या कारवाईत पथकाने ५ लाख १९ हजारांच्या रोकडसह चारचाकी, दुचाकी असा ६२ लाख ९४ हजार तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या कारवाईची कवठेमहांकाळ परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. ६६ जणांवर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
कवठेमहांकाळपासून शहराच्या पश्चिमेस एक हॉटेल आहे. या हॉटेलपासून काही अंतरावर असलेल्या पोल्ट्री शेडमध्ये बेकायदेशीरपणे तीनपानी जुगार अड्डा सुरू करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना या जुगार अड्ड्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ एका पोलिस पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार अधीक्षक यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. जुगार अड्ड्यावर पोलिस पथकाचा छापा पडल्याचे समजताच काहींनी शेडमधून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने दरडावताच सर्व शांत झाले. पोलिसांनी ६५ जणांना ताब्यात घेतले. एकजण मात्र पसार झाला.
रविवारी रात्री साडेसात वाजता सुरू झालेली ही कारवाई मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. या कारवाईत पोलिस पथकाने तब्बल ५ लाख १९ हजार ८३० रुपये रोकड जप्तप्त केली. तसेच ५७ लाख ७४ हजार दोनशे रुपयांच्या वाहनासह इतर साहित्य, मोबाईल असा सुमारे ६२ लाख ९४ हजार ३० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या ६६ जणांवर जुगार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विनायक मसाळे तपास करीत आहेत.
कवठेमहांकाळ पोलिसांचा कानाडोळा
कवठेमहांकाळपासून काही अंतरावरच एवढ्या मोठ्या प्रमाणात तीन पानी जुगार अड्डा सुरू असूनही त्याची पोलिसांना माहिती नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी अर्थपूर्ण कानाडोळा केला होता. परंतु, तक्रार येताच अधीक्षक घुगे यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईचे कौतुक होत आहे.