Sangli Politics: आगामी निवडणुकीत जरांगे फॅक्टरचे दर्शन घडणार, इस्लामपुरात तिरंगी लढतीची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:13 IST2025-10-18T18:10:06+5:302025-10-18T18:13:40+5:30
नगराध्यक्षपदाचे दावेदार वाढले

Sangli Politics: आगामी निवडणुकीत जरांगे फॅक्टरचे दर्शन घडणार, इस्लामपुरात तिरंगी लढतीची चिन्हे
अशोक पाटील
इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इस्लामपूरमध्ये नव्याने एंट्री झाली होती आणि पालिका निवडणुकीतही अजित पवार गट सक्रिय झाला आहे. आता पंजाबराव पवार यांनी मनोज जरांगे यांचे नेतृत्व मानून नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत जरांगे फॅक्टरचे दर्शनही घडणार आहे.
पंजाबराव पवार यांनी अलीकडील काळात मनोज जरांगे यांचे नेतृत्व मानून सक्रिय राहणे पसंत केले आहे. नगरपालिकेच्या राजकारणात शहर सुधार समिती स्थापन करण्यात ते पुढे होते. त्यांनी पालिका निवडणूकही लढविली आहे. आता जरांगे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासाठी पंजाबराव पवार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे येथे तिंरगी लढत होण्याची शक्यता आहे.
पालिका निवडणुकीच्या रणांगणात आमदार जयंत पाटील यांचा एकमेव गट आहे. त्यांच्या विरोधात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि आता जरांगे फॅक्टर पालिकेच्या राजकारणात आला आहे. जयंत पाटील यांच्या विरोधी असलेल्या गटात अंतर्गत संघर्ष आहे. त्यातच आता जरांगे फॅक्टरचे नाणे चालणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वी शहरात मनोज जरांगे यांचे नेतृत्व मानणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळेच मनोज जरांगे फॅक्टरसाठी पंजाबराव पवार यांनी पालिकेच्या राजकारणात उतरण्याची तयारी केली आहे. आता पवार थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार असून, लवकरच जरांगे यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
कोणत्याही परिस्थितीत मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केला जाईल. पालिका निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालणार यात तिळमात्र शंका नाही. तरीही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. -पंजाबराव पवार, इस्लामपूर