Sangli: गुहागर–विजापूर महामार्गासाठी कडेगावमध्ये रस्त्यावर झोपून आंदोलन, वाहतूक काहीकाळ ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:26 IST2025-12-17T18:25:57+5:302025-12-17T18:26:15+5:30
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या या जनआंदोलनामुळे प्रशासन खडबडून जागे झाले.

Sangli: गुहागर–विजापूर महामार्गासाठी कडेगावमध्ये रस्त्यावर झोपून आंदोलन, वाहतूक काहीकाळ ठप्प
कडेगाव : गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या व अपूर्ण कामांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीविरोधात मंगळवारी कडेगाव येथे पाणी संघर्ष समितीच्या वतीने महामार्गावर थेट रस्त्यावर झोपून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या या जनआंदोलनामुळे प्रशासन खडबडून जागे झाले.
राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आणि पोलिस प्रशासनाच्या शिष्टाईनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. आंदोलनस्थळी बोलताना पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एस. देशमुख यांनी सांगितले की, गुहागर–विजापूर महामार्गाच्या कऱ्हाड ते कडेगाव या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे; मात्र आजतागायत संबंधित ठेकेदाराने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक ते वृक्षारोपण केलेले नाही. यामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान झाले असून त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली थांबवावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
कडेगाव येथील महालक्ष्मी मंदिर ते महात्मा गांधी विद्यालय आणि कडेगाव ओढा परिसरातील नाल्याचे काम गेल्या पाच महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
या आंदोलनात पाणी संघर्ष समितीचे बजरंग अडसूळ, संतोष डांगे, मोहन जाधव, नितीन शिंदे, प्रवीण करडे, सिराज पटेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इम्रान पटेल तसेच रघुनाथ गायकवाड, वैभव देसाई, शर्मिला मोरे, संजय धर्मे, भाऊसाहेब यादव, शशिकांत रासकर, जीवन करकटे, नामदेव रासकर यांच्यासह महिला व पुरुष आंदोलनकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेगाव परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
"गुहागर–विजापूर महामार्गासंदर्भातील पाणी संघर्ष समितीच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी कडेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयात येत्या एक ते दोन दिवसांत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीस प्रांताधिकारी, तहसीलदार, राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच पाणी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील.” - सचिन भुतल, कनिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभाग