सांगलीत रमजानच्या नमाजनंतर वक्फ विधेयकाविरोधात आंदोलन, पाचजणांवर गुन्हे दाखल
By संतोष भिसे | Updated: April 1, 2025 16:59 IST2025-04-01T16:58:38+5:302025-04-01T16:59:39+5:30
सांगली : वक्फ संशोधन विधेयकाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या पाचजणांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शौकात इनामदार (रा. जयहिंदनगर, मिरज), मोहम्मद ...

सांगलीत रमजानच्या नमाजनंतर वक्फ विधेयकाविरोधात आंदोलन, पाचजणांवर गुन्हे दाखल
सांगली : वक्फ संशोधन विधेयकाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या पाचजणांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शौकात इनामदार (रा. जयहिंदनगर, मिरज), मोहम्मद सिद्दिक बागवान (मूळ रा. कुरुंदवाड, सध्या रा. नुराणी मस्जिदीजवळ, मिरज), शमशुद्दीन इलायत तुल्ला शेख, रा. गुरुवार पेठ, मिरज), निहाल मतवाल (मूळ रा. कुरुंदवाड, सध्या रा. सरदार जमादार, मिरज यांच्याकडे) आणि जावेद मकसुद शेख (रा. रामनगर, सांगली), अशी त्यांची नावे आहेत.
त्यांच्याविरोधात पोलिस कर्मचारी सद्दामहुसेन मन्सूर मुजावर (रा. कुपवाड) यांनी फिर्याद दिली. सांगलीत जुना बुधगाव रस्त्यावर ईदगाह मैदानावर सोमवारी (दि. ३१) सकाळी रमजान ईदचे सामुदायिक नमाज पठण होते. पठण झाल्यावर या पाचजणांनी मैदानाबाहेर दोशी ऑटोमोबाईल दुकानासमोर उभे राहून आंदोलन केले. वक्फ संशोधन विधेयकाविरोधात घोषणाबाजी केली. घोषणांची पत्रके झळकवली.
पोलिसांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या जिल्हाभरात बंदी आदेश लागू केला आहे. कोणत्याही आंदोलनास मनाई आहे. पोलिसांनी आंदोलनास परवानगी दिलेली नव्हती. तरीही पाचजणांनी आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचा भंग केला. पोलिसांनी पाचही जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २२३, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ नुसार गुन्हे दाखल केले.