Sangli: टिपेश्वर अभयारण्यातून चांदोलीत येणार पाहुणा, सह्याद्रीत वाघाच्या स्थलांतराचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:59 IST2025-01-03T12:58:58+5:302025-01-03T12:59:18+5:30
ताडोबातून स्थलांतरासाठीही मंजुरी

Sangli: टिपेश्वर अभयारण्यातून चांदोलीत येणार पाहुणा, सह्याद्रीत वाघाच्या स्थलांतराचा प्रस्ताव
सांगली : यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात आलेला वाघ सह्याद्री खोऱ्यात सोडण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास तो चांदोली अभयारण्य किंवा कोयनेच्या जंगलपट्ट्यात सोडला जाऊ शकतो.
सध्या सह्याद्रीच्या खोऱ्यात स्थलांतरित वाघांचा वावर आहे. वन विभागाच्या कॅमेऱ्यांत अधूनमधून चित्रीत होणारे वाघ राधानगरीपासून गोव्यापर्यंतच्या टापूत फिरताना आढळले आहेत. सध्या कोयना किंवा चांदोलीमध्येच कायमस्वरूपी अधिवास असणारा वाघ नाही. बार्शी परिसरातील वाघ येथे आल्यास अधिवास निश्चितीसाठी संघर्ष उद्भवणार हे निश्चित आहे.
गेल्या महिन्यात यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून एक वाघ बार्शी परिसरात आला आहे. त्याने सुमारे ५०० किलोमीटरचा प्रवास केला असून धाराशिवमार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. बार्शी ते धाराशिव या टापूत त्याचा वावर असल्याचे वन विभागाला आढळले आहे. या वाघाला जेरबंद करून रेडिओ कॉलर लावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठविण्याचा वन विभागाचा विचार आहे. तसा प्रस्ताव सोलापूर विभागाने शासनाकडे पाठविला आहे.
या वाघामुळे बार्शी तालुक्यातील १४ गावांत घबराटीचे वातावरण आहे. काही जनावरांवर त्याने हल्लेही केले आहेत. त्यामुळे त्याला पकडण्याचा वन विभागाचा प्रस्ताव आहे. त्याला सह्याद्री खोऱ्यात सोडण्याचा प्रस्ताव वन विभागाच्या पुणे कार्यालयाकडे गेला असून तेथे मंजुरी मिळाल्यास मुंबईला पुढील मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. अंतिम निर्णय नागपूरमध्ये होईल.
वन विभागाच्या अगदी अलीकडील निरीक्षणानुसार सह्याद्री खोऱ्यात सध्या एसटीआर - टी १ या वाघाचे वास्तव्य आहे. चांदोली वन्यजीव विभागात १७ डिसेंबर २०२३ रोजी तो पहिल्यांदाच दिसला होता. त्यानंतर सलग वर्षभर त्याच्यावर नजर ठेवण्यात आली. या कालावधीत तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातच वास्तव्यास असल्याचे आढळले आहे. बार्शी परिसरातील वाघ येथे सोडल्यास अधिवासासाठी संघर्ष उद्भवणार आहे.
ताडोबातूनही वाघ येणार
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून काही वाघांच्या जोड्यांचे सह्याद्री खोऱ्यात पुनर्वसन करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार लवकरच कार्यवाही सुरू होणार आहे. यानिमित्ताने सह्याद्रीत वाघांची डरकाळी पुन्हा घुमणार आहे.