‘वक्फ’चे गैरसमज दूर करण्यासाठी सांगलीत सर्वधर्मीय परिषद घेणार, पुरोगामी संघटनांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:10 IST2025-05-26T18:10:13+5:302025-05-26T18:10:36+5:30
..मग बाबरी वक्फमध्ये का नाही?

‘वक्फ’चे गैरसमज दूर करण्यासाठी सांगलीत सर्वधर्मीय परिषद घेणार, पुरोगामी संघटनांचा निर्णय
सांगली : वक्फ कायद्याच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम केंद्र शासन करत आहे. कायद्याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी सांगलीत सर्वधर्मीय परिषद घेण्याचा निर्णय पुरोगामी संघटनांच्या बैठकीत झाला. परिषदेसाठी पाहुणे व दिवस नंतर निश्चित केला जाणार आहे.
सांगलीत कष्टकऱ्यांची दौलत सभागृहात रविवारी बैठक झाली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भूमिका मांडल्या. धनाजी गुरव म्हणाले, वक्फ कायद्याच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम धर्मीयांत तेढ निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. वक्फ या संकल्पनेचा चुकीची अर्थ लावून मुस्लिमांच्या जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकतर्फी प्रचारामुळे हिंदू-मुस्लिमांची मने कलुषित होत आहेत. याला वेळीच आवर घातला नाही, तर भविष्यात मोठे सामाजिक संकट निर्माण होईल.
ॲड. अजित सूर्यवंशी म्हणाले, वक्फच्या जमिनी व अन्य स्थावर संपत्ती लूटमार करून किंवा जबरदस्तीने घेतलेल्या नाहीत. मुस्लीम धर्मीयांनी धार्मिक श्रद्धेपोटी त्या स्वत:हून दिल्या आहेत; पण याचा गैरअर्थ काढून त्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न दिसत आहे. पुणे येथील रिजवान शेख म्हणाले, वक्फमध्ये मुस्लीम धर्मीयांची स्थावर संपत्ती आहे, तशीच हिंदूंमध्ये त्यांच्या देवस्थानांचीही संपत्ती आहे; पण ही माहिती न देता चुकीचा प्रचार केला जात आहे.
प्रा. तोहिद मुजावर, जसबीर कौर खंगुरा, मुफ्ती जुबेर बेपारी, गॅब्रिएल तिवडे यांनीही यावेळी भूमिका मांडली. वक्फविषयीचे सर्व गैरसमज आणि चुकीचा प्रचार खोडून काढण्यासाठी सांगलीत सर्वधर्मीय परिषद घेण्याचा निर्णय झाला. बैठकीला विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष विकास मगदूम, ज्योती अदाटे, सचिन करगणे, महाबीर उमर फारुख, इरफान अली, राजू कांबळे, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब पाटील, विशाल कोठावळे, दत्तात्रय बामणे, अशफाक शेख आदी उपस्थित होते.
अन्य अल्पसंख्याकांवरही संकट
बैठकीत भूमिका मांडण्यात आली की, सध्या मुस्लीम धर्मीयांपुरते असणारे हे संकट भविष्यात जैन, शीख आदी अल्पसंख्याकांवरही येण्याची भीती आहे. त्यामुळे आताच त्याचा सामूहिक मुकाबला करायला हवा. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सर्वधर्मीयांनी एकजूट करायला हवी.
..मग बाबरी वक्फमध्ये का नाही?
दिसेल ती जागा ‘वक्फ’चीच अशी भूमिका असती, तर वक्फ समितीने बाबरी मस्जिदीवरही दावा सांगितला असता; पण ही मस्जिद वक्फमध्ये नव्हती, याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले.