विटा : विटा येथून तामिळनाडूतील कोईमतुरकडे जाणाऱ्या व्यंकटेश्वरा या खासगी ट्रॅव्हल्स बसचा कर्नाटकात भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या भरधाव मोटारीला चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्स थेट दुभाजकावर आदळून पलटी झाली. यात दोघे जागीच ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले. अर्णवी सचिन महाडिक (वय ११, रा. नेवरी, ता. कडेगाव) आणि यश सावंत (२०, रा. बस्तवडे, ता. तासगाव) अशी मृतांची नावे आहेत. कर्नाटकातील मोटेबेन्नूर (जि. हावेरी) गावाजवळ सोमवारी (दि.१८) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे.विट्यातील व्यंकटेश्वरा ट्रॅव्हल्स ही खासगी प्रवासी वाहतूक बस (क्र. एआर-११- ई - ९२९१) विटा ते सेलममार्गे कोईमतूर अशी दररोज ये जा करीत असते. सोमवारी दुपारी ३ वाजता ही बस कोईमतूरकडे रवाना झाली. या बसमध्ये एकूण ३१ प्रवासी असल्याचे सांगण्यात आले. रात्री साडे बारा वाजता हावेरी जिल्ह्यातील मोटेबेन्नूर (ता. ब्याडगी) गावजवळ राष्ट्रीय महामार्गावरून बस जात असताना दुभाजकाच्या एकाच बाजूने समोरून भरधाव वेगाने दुसरी मोटार आली. या मोटारीला चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्स थेट दुभाजकावर आदळून पलटी झाली.या अपघातात अर्णवी महाडिक आणि यश सावंत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य ६ जण गंभीर जखमी झाले. हावेरी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका यशोदा वंतगोडी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी तत्काळ मदत कार्य सुरू केले. जखमींवर हावेरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची ब्याडगी पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.
लेक ठार, महाडिक कुटुंबिय जखमीमृत अर्णवी ही मूळची कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील आहे. तिचे वडील सचिन महाडिक हे आपल्या पत्नीसह सेलम येथे गलाई व्यवसायानिमित्त स्थायिक आहेत. त्यांना सहा वर्षाची आणखी एक मुलगी आहे. नेवरी येथे सचिन महाडिक यांचे आई-वडील आणि भाऊ राहतात. गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वीच आपल्या कुटुंबासह नेवरी येथे आले होते. सेलम येथे ते परतताना महाडिक कुटुंबिय जखमी झाले.