रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 21:08 IST2025-06-21T21:07:47+5:302025-06-21T21:08:18+5:30

सांगली मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकणाऱ्या सुबोधसिंग याच्या टोळीतील संशयित प्रिन्सकुमार शिवनाथ सिंग याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.

Prince Kumar arrested in Reliance robbery; taken into custody from Dehradun jail, provided two-wheeler to accomplices | रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली

रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली

सांगली मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकणाऱ्या सुबोधसिंग याच्या टोळीतील संशयित प्रिन्सकुमार शिवनाथ सिंग (वय २७, रा. तानापूर, दिलावरपूर, जि. वैशाली, बिहार) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. डेहराडून कारागृहातून त्याचा ताबा घेण्यात आला. आतापर्यंत दरोड्यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर तिघेजण अद्याप पसार आहेत.

मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्सवर ४ जून २०२३ रोजी दरोडेखोरांनी पोलिस असल्याचे सांगून भरदुपारी सशस्त्र दरोडा टाकला. सर्व कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून ६ कोटी ४४ लाख रुपयांच्या दागिन्यांची लूट केली. दरोडा टाकताना आतमध्ये आलेला एक ग्राहक हा प्रकार पाहून पळून जात असताना त्याच्या दिशेने गोळीबारही करण्यात आला. सुदैवाने ग्राहक बचावला. भरदुपारी टाकण्यात आलेल्या दरोड्यामुळे पोलिस दलासमोर आव्हान उभे राहिले होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषणसह विश्रामबाग पोलिसांनी दोन महिने दरोड्याचा कसून तपास करताना सुबोधसिंग याच्या टोळीने हा दरोडा टाकल्याचे निष्पन्न केले. सांगलीनंतर ओडिशात रिलायन्स ज्वेल्सवर दरोड्याचा प्रयत्न झाला. त्यात सहभागी अंकुरप्रताप सिंग हा सांगलीतील दरोड्यात वाहनचालक असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर सुबोध सिंग हा खरा सूत्रधार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुख्य सूत्रधार सुबोध सिंग, महंमद मुख्तार, शशांक ऊर्फ सोनू धनंजयकुमार सिंग, एसपी ऊर्फ अनिल सोहनी या चौघांना अटक केली.

तपासात प्रिन्सकुमार याचे नाव निष्पन्न झाले होते. सांगलीतील दरोड्यानंतर टोळीने डेहराडून येथे दरोडा टाकला होता. त्यावेळी प्रिन्सकुमारला अटक केली होती. तो डेहराडून कारागृहात होता. विश्रामबाग पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. ट्रांजिट रिमांडद्वारे सांगली कारागृहात आणले. तेथून विश्रामबाग पोलिसांनी ताबा घेतला.

दरोड्यात दुचाकी पुरवली
प्रिन्सकुमार याला विश्रामबाग पोलिसांनी रिलायन्स ज्वेल्समध्ये तपासासाठी आणले. त्याने दरोड्यावेळी दुचाकी पुरवल्याचे सांगितले. दुचाकी कर्नाटकातील असून लातूर येथून घेतल्याचे कबूल केले. दरोड्यानंतर मिरजेजवळ ही दुचाकी टाकून दिली होती. त्यानंतर दरोडेखोर मोटारीतून पळाले होते.

पसार तिघांचा शोध
रिलायन्स दरोड्यात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरोड्यातील संशयित गणेश उद्धव बद्रेवार (रा. हैद्राबाद), प्रताप अशोकसिंग राणा (रा. वैशाली, बिहार), कार्तिक नंदलाल मुजुमदार (रा. हुगळी, पश्चिम बंगाल) या तिघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव तपास करत आहेत.

Web Title: Prince Kumar arrested in Reliance robbery; taken into custody from Dehradun jail, provided two-wheeler to accomplices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.