प्राथमिक शिक्षक आता अंगणवाडीतही शिकविणार, शिक्षण विभागाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:10 IST2025-12-19T19:09:19+5:302025-12-19T19:10:15+5:30
मुलांना मिळणार प्रमाणपत्र, पहिलीच्या प्रवेशासाठी उपयुक्त

संग्रहित छाया
सांगली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतीलशिक्षकांना आता अंगणवाडीतही शिकवावे लागणार आहे. या शिक्षकांनी आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडीत शिकवावे, अशी शासनाची अपेक्षा आहे.
याबाबतचे पत्र शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षक आपल्या शाळेच्या १ किलोमीटर परिघातील अंगणवाडीतील मुलांचा पाया भक्कम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक गरजांनुसार मार्गदर्शन करतील. पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करतील. विशेषत: पहिलीच्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांवर ही जबाबदारी असेल.
नव्या शैक्षणिक धोरणात अंगणवाडी (पूर्व प्राथमिक) व पहिलीचा वर्ग एका स्तरावर आणण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी, त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया तयार व्हावा, हादेखील हेतू आहे. यासाठीच प्राथमिक शिक्षकांना आता आठवड्यातील एक दिवस अंगणवाडीसाठी द्यावा लागणार आहे.
अंगणवाडीतील मुलांसाठी पुण्यातील विद्या प्राधिकरणाच्या मदतीने आकार अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे आहेत. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांची मदत घ्यावी लागेल. त्यामुळेच शालेय शिक्षण विभागाने हे आदेश दिले आहेत.
कार्यक्रमातही सहभागी करून घ्या
जिल्हा परिषदेच्या शाळांतील १५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण, स्नेहसंमेलने, विविध सांस्कृतिक कार्यक्रम यातही अंगणवाडीच्या मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे. वार्षिक परीक्षा संपल्यावर अंगणवाडीतील मुलांनीही वयोगटानुसार आकार अभ्यासक्रम पूर्ण केल्याची खात्री करुन शिक्षक व अंगणवाडी सेविकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मुलांना दिले जाईल. त्यानंतर त्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळेल. या माध्यमातून प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढविण्याचेही शासनाचे प्रयत्न आहेत.
प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडीच्या मुलांनाही प्राथमिक ज्ञान द्यावे, अशी शासनाची अपेक्षा आहे. याद्वारे ते अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामकाजात मदत करतील, शिवाय अंगणवाडीतील मुलांचा प्राथमिक शिक्षणासाठीचा पायाही भक्कम करतील. - मोहन गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी