पुणे शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग, संघटनेतील उमेदवारांचे नेत्यांकडे हेलपाटे सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 19:11 IST2025-10-10T19:11:08+5:302025-10-10T19:11:49+5:30
सांगलीतून तगड्या उमेदवारीची वानवा

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग, संघटनेतील उमेदवारांचे नेत्यांकडे हेलपाटे सुरु
किर्लोस्करवाडी : पुणेशिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली असून शाळांना भेटी देत मतदार नोंदणीचे अर्ज भरून घेण्याचा धडाका लावला आहे. जरी निवडणुकीला सव्वा वर्षाचा अवधी उरलेला असला तरी वातावरण ढवळून निघाले आहे. विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांच्यासोबत माजी आमदार दत्तात्रय सावंत, विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे यांची नावे सद्यःस्थितीत चर्चेत आहेत.
मागील निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे आसगावकर यांनी दत्तात्रय सावंत यांचा पराभव केला होता. त्यांनी आमदार निधी इतर कामांसाठी न वापरता शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करत सर्व शाळांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी देखील त्यांनाच महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी गत निवडणुकीत पराभूत झाल्यावरही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पुणे, मुंबईसह संपूर्ण मतदारसंघात निरंतर पाठपुरावा सुरू ठेवला आहे. शिवाय पाचही जिल्ह्यांत त्यांनी मतदार नोंदणीचे अर्ज भरत आघाडी घेतली आहे. विनाअनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून चळवळीमध्ये सक्रिय असून या, लोकांना १००% अनुदान मिळावे, यासाठी दहा वर्षांपासून अनवाणी फिरत आहेत. टप्पा अनुदानासाठी त्यांनी दोनशेहून अधिक आंदोलने केली आहेत. मागीलवेळी त्यांनी माघार घेत आसगावकर यांना पाठिंबा दिला होता; परंतु यावेळी कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचा त्यांचा निर्धार आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख करमाळा येथील मंगेश चिवटे यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले असून, शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. एकंदर, निवडणुकीस अजून सव्वा वर्ष बाकी असतानाही इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. २०२० पासून या निवडणुकांत राजकीय पक्ष उतरल्यामुळे निवडणुकीला कॉर्पोरेट स्वरूप आले आहे. यामुळे शिक्षक संघटनेच्या उमेदवारांनी विविध राजकीय पक्षांचे उंबरे झिजवायला आधीपासूनच सुरुवात केली आहे.
सांगलीतून तगड्या उमेदवारीची वानवा
सांगली जिल्ह्याला आतापर्यंत भगवान साळुंखे आणि गजेंद्र ऐनापुरे असे दोन आमदार लाभले असून, यावेळी सांगलीमधून कुणीही तगडा उमेदवार नसल्याचे चित्र आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाचा कार्यक्षेत्र सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील एकूण ५८ तालुक्यांचा समावेश आहे.