Aadhaar Card Update: पालकांची चिंता मिटणार, सांगलीत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट टपाल खाते शाळांमध्येच करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 13:04 IST2025-10-21T13:03:20+5:302025-10-21T13:04:17+5:30
आधार प्राधिकरण व शिक्षण मंत्रालयाची संयुक्त मोहीम

Aadhaar Card Update: पालकांची चिंता मिटणार, सांगलीत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट टपाल खाते शाळांमध्येच करणार
प्रसाद माळी
सांगली : देशात आधार प्राधिकरणाने (यूआयडीएआय) विद्यार्थ्यांची आधार क्रमांकाशी जोडलेली बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करण्याची योजना आखली आहे. या योजनेंतर्गत सांगली टपाल विभागाने जिल्ह्यातील १३०७ शाळांमधून एक लाख २७ हजार ४०० विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावतीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यातील शाळांमध्ये जाऊन टपाल विभाग विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावतीकरणासाठी विशेष शिबिरे आयोजित करत आहे.
विद्यार्थ्यांची त्यांच्या आधार क्रमांकासाठी जोडलेली बायोमेट्रिक माहिती वयानुसार अद्ययावत करणे गरजेचे असते. परंतु, बहुसंख्य विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावतीकरण राहून गेले आहे. पाच वर्षानंतर आधार कार्ड अद्ययावत करणे गरजेचे आहे. नाही तर शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती, परीक्षा नोंदणीसारख्या कामांसाठी अडचणी निर्माण होतात.
हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाची मोहीम आधार प्राधिकरण व शिक्षण मंत्रालयाने एकत्रित मोहीम आखली आहे. ही मोहीम पार पडण्याची मोठी जबाबदारी टपाल खात्यावर सोपविण्यात आली आहे. टपाल विभागाच्या मार्फत शाळांमध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे अद्यावतीकरण केले जात आहे. देशामधील तब्बल सात कोटीहून अधिक मुलांना याचा फायदा होणार आहे.
मोफत अद्ययावतीकरण
सांगली टपाल विभागाकडून आतापर्यंत विविध शाळांमध्ये ९० शिबिरांचे आयोजन केले. यामध्ये १५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यात आले आहे. यामध्ये थम्ब स्कॅनर, डोळे स्कॅन करणे, फोटो अपडेट करणे आदी ५ ते १७ वर्षांपर्यंतच्या वयोगटासाठी मोफत करण्यात आले आहे.
अन्यथा आधार क्रमांक निष्क्रिय होण्याची भीती
बायोमेट्रिक अद्ययावतीकरण वेळेवर पूर्ण करणे हे मुलांच्या बायोमेट्रिक माहितीची अचूकता आणि विश्वासार्हता राखण्यासाठी आवश्यक आहे. सध्याच्या नियमानुसार सात वर्षांनंतर हे अद्ययावतीकरण पूर्ण न झाल्यास आधार क्रमांक निष्क्रिय केला जाऊ शकतो.
जिल्ह्यातील टपाल विभागाच्या ५० कार्यालयांमध्ये आधार कार्ड अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांसह नागरिकांनी आपले आधार कार्ड या कार्यालयांच्या माध्यमातून अद्ययावत करावेत तसेच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी शाळांनी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क करावे. - बसवराज वालिकार, प्रवर अधीक्षक, टपाल विभाग, सांगली.