Sangli: फ्रिज काॅम्प्रेसर फुटल्याने आग लागल्याची शक्यता, महावितरणचा प्राथमिक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:06 IST2025-11-11T12:04:25+5:302025-11-11T12:06:01+5:30
आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला

Sangli: फ्रिज काॅम्प्रेसर फुटल्याने आग लागल्याची शक्यता, महावितरणचा प्राथमिक अंदाज
सांगली : विटा (ता. खानापूर) येथील एका भांडी व फर्निचर दुकानाला अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर महावितरणचे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन विद्युत वाहिन्यांची तपासणी केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या प्राथमिक माहितीनुसार, फ्रीजचा काॅम्प्रेसर फुटल्यामुळे अपघात झाला असण्याची शक्यता आहे, अशी माहिती विटा येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांनी दिली.
विटा येथील आगीच्या घटनेनंतर महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लगेच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांच्याशी 'लोकमत'च्या प्रतिनिधींनी संपर्क साधला. यावेळी इदाते म्हणाले की, आगीच्या घटनेनंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. विद्युत अधिकाऱ्यांच्या प्राथमिक माहितीनुसार फ्रीजचा काॅम्प्रेसर फुटल्यास आग लागल्यामुळे ही घटना घडली असण्याची शक्यता आहे.
महावितरणने मीटरपर्यंत दिलेल्या कनेक्शनची पाहणी केली असून, कुठेही तांत्रिक दोष आढळले नाहीत. आग लागलेल्या घर आणि दुकानाचा वीजपुरवठा बंद केला आहे आणि उर्वरित ठिकाणांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. आगीच्या कारणाचे अधिक स्पष्टीकरण मंगळवारी महावितरणच्या विद्युत निरीक्षकांनी केलेल्या पाहणीनंतर स्पष्ट होईल.
विद्युत निरीक्षक आज भेट देणार
आगीचे खरे कारण शोधण्यासाठी महावितरणमधील विद्युत निरीक्षकांचे विशेष पथक विटा येथे भेट देऊन पाहणी करणार आहे. याशिवाय अन्य शासकीय तपास यंत्रणेचे अधिकारीही येणार आहेत. या तपासणीनंतर विट्यातील आगीचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.