Sangli: उरुण-ईश्वरपूर पालिकेत बहुरंगी लढतीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:31 IST2025-11-05T19:30:53+5:302025-11-05T19:31:37+5:30
Local Body Election: जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या नावाची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती

Sangli: उरुण-ईश्वरपूर पालिकेत बहुरंगी लढतीची शक्यता
युनूस शेख
इस्लामपूर : ईश्वरपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा बिगुल वाजल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्षासह विविध पथकांची नियुक्ती करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यावेळची निवडणूक ही बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या नऊ वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१६मध्ये पालिकेची निवडणूक झाली होती. त्या सभागृहाची मुदत २०२१मध्ये संपल्यानंतर जानेवारी २०२२पासून प्रशासकीय राजवटीचा कारभार सुरू झाला होता. त्यानंतर ३ वर्षे १० महिन्यांच्या कालावधीनंतर आता नव्या सभागृहासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
गेल्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील गटाची ३१ वर्षांची सत्ता उलथवून टाकत विकास आघाडीच्या निशिकांत भोसले-पाटील यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारली होती. मात्र, प्रभागातील संख्या बळात अपक्षाची साथ घेत राष्ट्रवादीने सभागृहातील बहुमत आपल्याकडे राखले होते. त्यामुळे विविध विषय समित्यांच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे नगरसेवक राहिले होते. विकास आघाडीचे १३ नगरसेवक, तर राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक निवडून आले. एका जागी अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती.
यावेळच्या निवडणुकीसाठी आ. जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विचारात न घेताच नगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या नावाची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती. दुसरीकडे विकास आघाडी म्हणून की महायुती म्हणून लढायचे, अशा संभ्रमात असलेल्या गटाकडून अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. या गटाकडून माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांच्या नावावर एकमत झाल्याची चर्चा असली तरी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
दुसरीकडे काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी चालवली असून, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचाही उमेदवार येण्याची शक्यता आहे. शहरातील इतर सामाजिक, पुरोगामी, परिवर्तनवादी आणि डाव्या विचारांना मानणाऱ्या गटांचीही निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.
मावळत्या सभागृहातील बलाबल
- नगराध्यक्ष- विकास आघाडी - १
- नगरसेवक - विकास आघाडी -१३
- नगरसेवक- राष्ट्रवादी-१४
- अपक्ष - १
एका प्रभागाची वाढ
यंदाच्या निवडणुकीत एका प्रभागाची वाढ होत ती १५ इतकी झाली आहे. या १५ प्रभागांतून ३० नगरसेवक निवडले जाणार आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या मतदानासाठी ६४ हजार २१५ इतकी मतदार संख्या आहे. प्रभाग १५ हा सर्वाधिक ५,५९५ मतदार संख्येचा आहे. त्याखालोखाल प्रभाग क्र. २ हा ५,१९३ आणि प्रभाग क्र. ६ हा ५,०९७ मतदार संख्येचा आहे. प्रभाग क्रमांक ११ हा सर्वात कमी २,७४५ मतदार संख्येचा आहे.