Sangli: विश्वास साखर कारखान्यास प्रदूषण मंडळाची नोटीस, प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 18:48 IST2025-03-19T18:48:00+5:302025-03-19T18:48:28+5:30
वारणा नदी प्रदूषण प्रश्नी निर्देश

संग्रहित छाया
सांगली : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास साखर कारखान्यातून सोडल्या गेलेल्या मळीमिश्रित सांडपाण्याने वारणा नदीचे प्रदूषण वाढल्याची तक्रार स्वतंत्र भारत पक्षाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. त्याची दखल घेत मंडळाने कारखान्यास नोटीस दिली असून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे.
स्वतंत्र भारत पक्षाचे संस्थापक सुनील फराटे यांनी याबाबतची तक्रार प्रदूषण मंडळाकडे केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या साखर व डिस्टिलरी युनिट मधून मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात आहे. हे सांडपाणी एका नाल्यात सोडले जात असून हा नाला पुढे जाऊन वारणा नदीत मिसळतो. त्यामुळे वारणा नदीपात्र प्रदूषित होत आहे. नागरिकांच्या तसेच येथील जलचरांच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होत आहे. प्रदूषणाबाबत येथील नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, तरीही त्या सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.
मंडळाच्या सांगलीतील उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी १७ डिसेंबर २०२४ रोजी कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आदेशाचे पालन न केल्याने कोल्हापूरच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी आता या उद्योगाला प्रक्रिया प्रकल्पाच्या दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत.
ताबडतोब उपाय करण्याचे निर्देश
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अधिकारी जे.एस. हजारे यांनी कारखान्याला तातडीने ईटीपीमध्ये दुरुस्ती तसेच प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाल्यात जाण्यापासून रोखण्याचे निर्देश दिले आहेत.
विश्वास कारखान्याकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकाप्रमाणेच स्पेंट वॉशची संपूर्ण प्रक्रिया होते. ईटीपी सुद्धा व्यवस्थित कार्यान्वित असतो. सध्या कारखाना बंद होऊन पंधरा दिवस झाले आहेत. यापूर्वीही कारखान्याचे कोणतेही सांडपाणी कुठेही नैसर्गिक स्रोतात सोडलेले नाही. मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही याबाबतची प्रत्यक्ष माहिती आम्ही दिलेली आहे. कारखान्याबाबत अकारण गैरसमज पसरवला जात आहे. - अमोल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, विश्वास सहकारी साखर कारखाना, चिखली (ता. शिराळा)