Sangli Crime: चौकशीसाठी गेलेल्या पोलिस पथकावर किल्लेमच्छिंद्रगडला हल्ला, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:16 IST2025-07-28T15:15:33+5:302025-07-28T15:16:24+5:30

मारहाणीच्या चौकशीसाठी गेले होते पथक, चौघे हल्लेखोर ताब्यात

Police team attacked at Killemachindragad for investigation in sangli two injured | Sangli Crime: चौकशीसाठी गेलेल्या पोलिस पथकावर किल्लेमच्छिंद्रगडला हल्ला, दोघे जखमी

Sangli Crime: चौकशीसाठी गेलेल्या पोलिस पथकावर किल्लेमच्छिंद्रगडला हल्ला, दोघे जखमी

इस्लामपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे एकाच्या डोक्याला पिस्तूल लावून दमदाटी केल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावरच चौघांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा प्रकार शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडला. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

दरम्यान, जखमी हवालदार जालिंदर पांडुरंग माने यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल शंकर साळुंखे, ओंकार मोहन कदम, कांचन शंकर साळुंखे, मयुरी अतुल साळुंखे अशा चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील हत्यार व दुचाकी जप्त केली आहे. न्यायालयाने चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

इस्लामपूर पोलिसांचे पथक डायल ११२ या वाहनातून पेट्रोलिंग करत होते. वाळवा तालुक्यातील बहे, नरसिंहपूर मार्गे किल्लेमच्छिंद्रगड गावच्या कमानीजवळ आले असता, तिथे दुचाकीवरून घाबरलेल्या अवस्थेत निघालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांना हात करून थांबवले. त्यातील एकाने माझ्या वडिलांच्या डोक्याला पिस्तूल लावून दमदाटी करून विजय सांळुखे व ओंकार कदम निघून गेले आहेत. त्यांना ताबडतोब पकडा, असे सांगितल्याने पोलिसांचे पथक गावामध्ये गेले होते.

पथकातील जालिंदर माने, आकाश सावंत, अजय काळे हे विजय साळुंखे याच्या घराजवळ जाऊन घटनेबाबत चौकशी करू लागले. यावेळी अतुल साळुंखे याने मोबाईलवरून कोणाला तरी ‘तू लवकर पिस्तूल घेऊन ये, आज पोलिसांना जिवंत ठेवायचे नाही. त्यांना गोळ्या घालायच्या’, अशी दमदाटी केली. त्याचवेळी मोटारीतून एकजण आला. त्यानंतर अतुल साळुंखे याने दुचाकीला लावलेला ऊस तोडणीचा कोयता घेऊन हवालदार जालिंदर माने यांच्या डोक्यात वार केला. त्यांनी तो चुकवून दोन्ही हाताने अडवला. यात माने यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ जखम झाली.

याचवेळी पोलिस कर्मचारी आकाश सावंत यांनी ओंकार कदम याच्या हातातील कोयता काढून घेत असताना अतुल व ओंकार यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यात सावंत यांच्या तळहाताला कोयता लागून जखम झाली. तसेच दोन महिलांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक किरण दीडवाघ अधिक तपास करत आहेत.

पिस्तुलाबाबत चौकशी

पोलिस चौकशीसाठी गेल्यानंतर संशयित अजय साळुंखे याने कोणाला तरी कॉल करून ‘पिस्तूल घेऊन ये, पोलिसांना गोळ्या घालायच्या आहेत’, असे सांगितले होते. त्यामुळे कोणाला कॉल केला, पिस्तूल कोणाकडून मागवण्याचा प्रयत्न केला, याची पोलिस चौकशी करत आहेत.

Web Title: Police team attacked at Killemachindragad for investigation in sangli two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.