सांगली जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा, किती शेतकरी लाभापासून वंचित..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:08 IST2025-02-27T17:08:37+5:302025-02-27T17:08:59+5:30
तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मिळतात पैसे

सांगली जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा, किती शेतकरी लाभापासून वंचित..जाणून घ्या
सांगली : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील चार लाख ७३० शेतकरी घेत आहेत. पीएम किसान योजनेत वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. या योजनेत शेतकऱ्यांना १९ वा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला असून, जिल्ह्यातील चार लाख ७३० शेतकऱ्यांच्या खात्यावर ८० कोटी १४ लाख ६० हजार रुपये जमा झाले आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रत्येक हप्त्याला २ हजार प्रमाणे वर्षाला ३ हप्ते म्हणजे ६ हजार रुपयांचा लाभ दिला जातो. याचा लाभ डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जातो. केंद्र शासनाकडून १९ हप्त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. हा लाभ नियमित मिळण्यासाठी दरवर्षी केवायसी करणे बंधनकारक असते.
मात्र, शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश देऊनही हजारो शेतकरी लाभापासून दूर आहेत. जिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी चार लाख ११ हजार ३४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी तीन हजार ३५२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. यामुळे त्यांना पीएम किसान योजनेपासून वंचित राहावे लागले. उर्वरित चार लाख ७३० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८० कोटी १४ लाख ६० हजार रुपये जमा केले आहेत.
तालुकानिहाय पीएम किसानचे लाभार्थी
तालुका - शेतकरी संख्या
आटपाडी - २६,८०९
जत - ७०,४२७
कडेगाव - ३२,३३५
क. महांकाळ - २८,९११
खानापूर - २२,७५४
मिरज - ५३,३८८
पलूस - २२,८७६
शिराळा - ३६,६८२
तासगाव - ४१,१३१
वाळवा - ६५,४१७
एकूण - ४,००,७३०
जिल्ह्यात ३,३५२ शेतकरी लाभापासून वंचित
जिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी चार लाख ११ हजार ३४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. पण, वारंवार सूचना देऊनही तीन हजार ३५२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही, त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. याचसोबत ज्या शेतकऱ्यांनी नियमाबाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील तीन हजार ३५२ शेतकऱ्यांनी ई-केवायीसी पूर्ण केली नाही. या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे.
काय आहे शासनाची किसान सन्मान योजना?
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने बनविलेली एक कल्याणकारी योजना आहे.
- या योजनेंतर्गत २ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या देशभरातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये याप्रमाणे अनुदान दिले जाते.
- ही रक्कम वर्षभरात तीन हप्त्यांत म्हणजे चार महिन्यांनी एक हप्ता याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. त्यातील प्रत्येक हप्ता हा २ हजार रुपयांचा असतो.