कृपया 'या' वस्तूंची आवश्यकता आहे, मदतनीसांना सांगली मनसे जिल्हाध्यक्षांच आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 14:03 IST2019-08-12T14:03:25+5:302019-08-12T14:03:51+5:30
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे कोल्हापूर आणि सांगतीलीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पूरग्रस्त भागात आहेत

कृपया 'या' वस्तूंची आवश्यकता आहे, मदतनीसांना सांगली मनसे जिल्हाध्यक्षांच आवाहन
सांगली - गावातील प्रत्येक घरात चिखलाचा खच झालाय. घरातील गृहपयोगी वस्तू नष्ट झाल्या आहेत. सुरुवातीला घर साफ करण्यासाठी वस्तू हव्या आहेत. अत्यावश्यक गोष्टींमध्ये ट्युबलाईट, बल्ब, रोगराईपासून बचावासाठी मास्क, खराटे, फिनेल, प्लास्टीकच्या वस्तू. रोगराई पसरु नये यासाठी अंडरगारमेंट, नॅपकीन्स, पॅड या वस्तू अत्यंत आवश्यक आहेत, असे सांगलीचेमनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. यावेळी मनसेठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हेही त्यांच्यासमवेत होते. पूरग्रस्त भागातील निरीक्षण नोंदविल्यानंतर त्यांनी हे आवाहन केलं आहे.
राज्यभरातून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला मदत येत आहे. मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. स्थानिक सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत, पंढरपूरपासून ते शिर्डी देवस्थानपर्यंत सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत आहे. याकामी मराठी सिनेकलाकारही मागे नाहीत. मदतीचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू आहे. पण, नेमकी गरज कशाची हवीय? हेही मदत देणाऱ्या बांधवांनी लक्षात घ्यायला हवं. सध्या, एकाच प्रकारची मदत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यांसारख्या शहरातून येत आहे. तर, ग्रामीण भागातूनही याच प्रकारची मदत येते आहे. गहू, तांदुळ, साखर या किराणा मालाची गरज आहेच, पण सध्या गरज आहे ती आरोग्याकडे लक्ष देण्याची. त्यामुळे स्वच्छतेला प्राधान्य देऊन स्वच्छतापूरक वस्तूंची सध्या गरज असल्याचं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे कोल्हापूर आणि सांगतीलीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पूरग्रस्त भागात आहेत. या भागातील मतदकार्यावेळी निरीक्षण नोंदविल्यानंतर अविनाश जाधव आणि तानाजी सावंत यांनी मदत करणाऱ्या संस्था आणि दानशूर व्यक्तींना आवाहन केले आहे. त्यानुसार, मदतीच वर्गीकरणाबाबत त्यांनी मार्गदर्शन आणि आवाहन केलं आहे.
सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना नक्की कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश जाधव व सांगली जिल्हाध्यक्ष श्री. तानाजी सावंत ह्यांनी पूरग्रस्त भागात मदतकार्य केल्यानंतर नोंदविलेलं निरीक्षण.
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) August 12, 2019
आवर्जून पहा... कारण आवश्यक मदत पोहचवणं गरजेचं! #महापुरpic.twitter.com/i9JtsZ1NAY