Sangli: बामणोलीच्या स्मशानभूमीत भानामती, माजी सरपंचासह तिघांचे फोटो बाहुलीला बांधून पुरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:42 IST2025-10-27T13:41:26+5:302025-10-27T13:42:14+5:30
कुपवाड शहरालगत असलेल्या बामणोली गावातील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार निदर्शनास आला आहे.

Sangli: बामणोलीच्या स्मशानभूमीत भानामती, माजी सरपंचासह तिघांचे फोटो बाहुलीला बांधून पुरले
सांगली : कुपवाड शहरालगत असलेल्या बामणोली गावातील स्मशानभूमीत फोटो भानामतीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. माजी सरपंच राजेश सनोळी, सहकारी अमर वाघमोडे व वाघमोडे यांच्या आईचा फोटो काळ्या बाहुलीला बांधून गाडग्यात ठेवून पुरल्याचा प्रकार घडला होता. जनावराने स्मशानभूमीतील माती उकरल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला आहे. काही दिवसांपूर्वी हा प्रकार निदर्शनास आला होता; परंतु याची समाजमाध्यमासह गावात चर्चा रंगली आहे.
बामणोली गावात अंधश्रद्धेचे अनेक प्रकार सतत घडताना दिसतात. गावातील कोपऱ्या-कोपऱ्यावर लिंबू, नारळ, उतारे टाकले जातात. दर बुधवारी, शनिवारी आणि अमावास्या, पौर्णिमेला उतारा टाकण्याचे प्रकार सर्वत्र घडतात. दुसऱ्या दिवशी रस्त्यावरून जाताना ते दिसतात. त्यामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बामणोलीच्या स्मशानभूमीत देखील असाच प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. त्याची सध्या चर्चा चांगलीच रंगली आहे. अमावास्येला माजी सरपंच राजेश सनोळी, त्यांचे सहकारी अमर वाघमोडे, वाघमोडे यांच्या आई अशा तिघांचे फोटो काळ्या बाहुलीला बांधून त्याभोवती सुया, बिब्बा, लिंबू, गुलाल, गंडेदोरे गुंडाळून एका गाडग्यात टाकून ते जमिनीत पुरण्यात आले होते. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या काहींनी हे कृत्य केले होते.
अमावास्येनंतर स्मशानभूमीत काही जनावरे चरत असताना पायाला लागून काही वस्तू वरती आल्या. जनावराच्या मालकाने काठीने वस्तू बाजूला करून पाहिल्यानंतर माजी सरपंचासह तिघांचे फोटो बाहुलीला बांधलेले आढळले. त्याने तत्काळ माजी सरपंच सनोळी यांना हा प्रकार कळवला. त्यानंतर सनोळी यांनी हे सर्व जाळून टाकले; परंतु गावात सतत असे प्रकार घडत असल्यामुळे ‘फोटो’ भानामतीच्या प्रकाराची चर्चा रंगली आहे.