मुंबईतून शहरांना जोडणाऱ्या रेल्वेंची संख्या कमी, प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 19:27 IST2026-03-30T19:26:22+5:302026-03-30T19:27:01+5:30
खासगी बसवर अवलंबून राहिल्याने प्रवास खर्चात वाढ

मुंबईतून शहरांना जोडणाऱ्या रेल्वेंची संख्या कमी, प्रवाशांची गैरसोय
मिरज : सुट्टीच्या हंगामात रेल्वे प्रशासनाकडून मुंबईतून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मुंबईतून राज्यातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वेगाड्या कमी असल्याने राज्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
मुंबईहून उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांकडे एकूण ११७ गाड्या धावत आहेत. यात पाटणा (२३), गोरखपूर (१६), लखनौ (१७), कानपूर (२५) व वाराणसी (३६) या शहरांचा समावेश आहे. या तुलनेत मुंबईतून राज्यातील शहरांकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या केवळ २६ इतकीच आहे.
मुंबई-कोल्हापूर (२), लातूर/धाराशिव (३), पंढरपूर (१), नांदेड (६), शिर्डी (४) आणि शेगाव (९) अशी रेल्वे गाड्यांची आकडेवारी आहे. यामुळे उत्तर भारताच्या तुलनेत महाराष्ट्रातील शहरासाठी ४ ते ५ पट कमी गाड्या असल्याचे स्पष्ट होते. यामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा येथील प्रवाशांची अडचण होत आहे. रेल्वे सेवा अपुरी असल्याने प्रवाशांना खासगी बस व ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहावे लागत असल्याने प्रवास खर्चात वाढ होत आहे.
विशेषतः सांगली, लातूर, धाराशिव, पंढरपूर या शहरांना पुरेशी रेल्वे कनेक्टिव्हिटी नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. पूर्वी मिरज व कोल्हापुरातून सुटणाऱ्या सह्याद्री एक्स्प्रेस, कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस, पंढरपूर-मिरज सुपरफास्ट व मिरज-हुबळी एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्याही बंद करण्यात आल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
दररोज ६ ते ८ गाड्या सुरू करा
या पार्श्वभूमीवर मुंबई-कोल्हापूरदरम्यान दररोज ६ ते ८ गाड्या सुरू कराव्यात, मुंबई-लातूर, धाराशिव नवीन एक्स्प्रेस सुरू करावी, मुंबई-पंढरपूर नियमित सेवा उपलब्ध करावी यासह पश्चिम महाराष्ट्रासाठी नवीन रेल्वे मार्ग उभारण्याची मागणी आहे. राज्यात रेल्वेत दुय्यम वागणूक असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.