सांगलीत ११ जानेवारीला पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:41 IST2026-01-09T15:40:01+5:302026-01-09T15:41:13+5:30
तालसम्राट उस्ताद तौफिक कुरेशी, कश्यप बंधू, धनश्री पोतदार यांचा सहभाग

सांगलीत ११ जानेवारीला पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव
सांगली : शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि स्वरवसंत ट्रस्ट सांगली यांच्यावतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव रविवार, दि. ११ जानेवारी रोजी सांगलीत होत आहे. दुपारी तीन ते रात्री दहा यावेळेत भावे नाट्यमंदिर येथे होणाऱ्या या महोत्सवात अनेक नामवंत गायक, तालवादक कलाकारांबरोबरच कथ्थक नृत्य कलाकारही आपली कला सादर करणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त, पीएनजीचे संचालक मिलिंद गाडगीळ, चितळे उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे, स्वरवसंत ट्रस्टचे संस्थापक बाळासाहेब कुलकर्णी, डॉ. विकास गोसावी यांनी दिली.
महोत्सवाची सुरुवात पुणे येथील धनश्री नातू-पोतदार आणि सहकलाकार प्रस्तुत कथ्थक नृत्य सादरीकरणाने होणार आहे. त्यांना डॉ. आसावरी पाटणकर (पढंत), समीर पुणतांबेकर (तबला), मनोज देसाई (गायन व संवादिनी), गणेश फपाळ (पखवाज) यांची साथ असणार आहे. त्यानंतर गोवा येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक पं. राया कोरगावकर यांना पं. वसंत-नाथबुवा गुरव, ज्येष्ठ संवादिनी वादक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
त्यानंतर बनारस घराण्याचे दिग्गज कलाकार पद्मभूषण पं. राजन मिश्रा आणी पं. साजन मिश्रा यांचे शिष्य डॉ. प्रभाकर कश्यप आणि डॉ. दिवाकर कश्यप या बंधूंचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना तबला साथ पंडित रामदास पळसुले तर संवादिनी साथ मिलिंद कुलकर्णी करणार आहेत.
कार्यक्रमाची सांगता तालसम्राट उस्ताद तौफिक कुरेशी यांच्या जेंबे वादनाने होणार आहे.
जागतिक कीर्तीचे उस्ताद झाकीर हुसेन यांचे बंधू संगीतकार तौफिक कुरेशी यांनी संगीत क्षेत्रात स्वतःच्या प्रतिभेचा ठसा उमटवला आहे. कार्यक्रमाचे निवेदन पुणे येथील प्राजक्ता कुलकर्णी व सांगलीचे विजय कडणे हे करणार असून, ध्वनी व्यवस्था राजू सुपेकर यांची आहे. रविवारी दुपारी ३ वाजता महोत्सवाचे उद्घाटन दीपक केळकर महाराज यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका उपलब्ध आहेत.