..अन्यथा ठेकेदारांच्या आत्महत्या होतील, माजी मंत्री जयंत पाटील यांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 18:57 IST2025-02-13T18:57:01+5:302025-02-13T18:57:37+5:30
कुंडल : शासन कामांचे ठेके इतक्या चुकीच्या पद्धतीने आणि अंधाधुंद पद्धतीने ठेकेदारांना देत आहे की, आता या ठेक्यांचे पैसे ...

..अन्यथा ठेकेदारांच्या आत्महत्या होतील, माजी मंत्री जयंत पाटील यांचे सूचक विधान
कुंडल : शासन कामांचे ठेके इतक्या चुकीच्या पद्धतीने आणि अंधाधुंद पद्धतीने ठेकेदारांना देत आहे की, आता या ठेक्यांचे पैसे देण्यास शासनाकडे पैसे नाहीत. हे पैसे जर ठेकेदारांना वेळेत दिले नाहीत तर आजवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या जशा पहायला मिळत होत्या, तशा आता ठेकेदारांच्या आत्महत्या पहायला मिळण्याची शक्यता आहे, असे सूचक विधान माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले.
ते कुंडल (ता. पलूस) येथे मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचा षष्ट्याब्दीपूर्ती सोहळा, क्रांतिवीर दिवंगत आर. एस. ऊर्फ मामासाहेब पवार यांची ११०व्या जयंती व बँकेच्या नूतन इमारतीचा उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार विश्वजित कदम, समित कदम, मानसिंग नाईक, महेंद्र लाड, शरद लाड, प्रतीक पाटील, सुधीर जाधव, दिलीपराव नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी भारत नाईक आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, जागतिक पातळीवर रुपयाचे अवमूल्यांकन होत असताना आपली प्रगती वाढते आहे की, थांबली आहे, हे पाहावे लागेल. सामान्य नागरिक नेहमी कामात असताना ही आपल्या रुपयाचे अवमूल्यांकन होत असेल तर याला कारणीभूत कोण आणि त्याचा भुर्दंड कोणावर? रुपया घसरणे हे जगाच्या बाजारपेठेत चांगले लक्षण नाही.
लाडकी बहीण योजनेतून साडेपाच लाख भगिनींची नावे कमी केली. यासाठी आम्ही आता लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहोत. किमान अजून कोणाची नावे कमी होऊ देऊ नका कारण त्यांनी मतदान केले आहे. झालेली चूक आता सुधारू नका असेही जयंत पाटील म्हणाले.
विश्वजित कदम म्हणाले, कुंडलच्या मातीत जादू आहे, येथे अनेक क्रांतिवीर जन्मले त्यामुळे ही माती इतिहासाच्या पानात सुवर्ण शब्दात उल्लेखित आहे. मामासाहेब पवार यांनी भविष्याचा वेध घेऊन उद्योग सुरू केले. औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मामासाहेब नेहमी मदतीचा हात पुढे करत यातून अनेक व्यावसायिक या परिसरात घडले.
बाळासाहेब पवार म्हणाले, प्रयागराजसारखा इथे ही जयंत पाटील, विश्वजित कदम आणि नेते मंडळी हा ही एक कुंभमेळा येथे जमला आहे. मार्चनंतर सभासदांना दहा टक्के लाभांश दिला जाईल. तसेच सहा टक्के बक्षीस म्हणून देण्याच्या विचाराधीन आहे.