Sangli: बहुमताच्या जोरावर विरोधकांकडून सरपंचांच्या निर्णयात हस्तक्षेप, व्हसपेठ ग्रामपंचायतीच्या सहाजणांचे सदस्यपद रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:03 IST2025-06-20T19:03:14+5:302025-06-20T19:03:55+5:30

जिल्हा परिषदेच्या प्रस्तावावर विभागीय आयुक्तांची कारवाई

Opposition interferes in Sarpanch decisions on the strength of majority, membership of six people of Vaspeth Gram Panchayat cancelled in Sangli | Sangli: बहुमताच्या जोरावर विरोधकांकडून सरपंचांच्या निर्णयात हस्तक्षेप, व्हसपेठ ग्रामपंचायतीच्या सहाजणांचे सदस्यपद रद्द

संग्रहित छाया

सांगली : व्हसपेठ (ता. जत) येथील लोकनियुक्त सरपंच पूनम तुराई यांच्या निर्णयात बहुमताच्या जोरावर विरोधकांकडून हस्तक्षेप होत होता. विकास काम करण्यात अडचणी येत असल्याची तक्रार सरपंच तुराई यांनी जिल्हा परिषदेकडे दिली होती. या तक्रारीनुसार पुणे विभागीय आयुक्तांनी विरोधी गटाच्या सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

व्हसपेठ ग्रामपंचायत निवडणूक २०२३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत एका गटाच्या लोकनियुक्त सरपंच आणि तीन सदस्य विजय झाले. विरोधी गटाचे सहा सदस्य विजय झाल्यामुळे त्यांच्या गटाचा उपसरपंच आहे. लोकनियुक्त सरपंच पूनम तुराई यांच्याकडे बहुमत नसल्यामुळे विरोधी गटाकडून विकास कामात अडथळा आणला जात आहे. यासंबंधी सरपंच तुराई यांनी जत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली होती. 

या तक्रारीनुसार विरोधी गटाच्या सदस्यांविरोधात कारवाईचा जिल्हा परिषदेकडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव गेला होता. या प्रस्तावानुसार अर्चना घोदे, शहानूर नदाफ, संगीता हुवाळे, सुमन जाधव, आप्पासो लेंगरे आणि अंकुश कांबळे यांचे सदस्यत्व विभागीय आयुक्तांनी रद्द केले आहे. यासंबंधीचा लेखी आदेश जिल्हा परिषदेला १८ जून २०२५ रोजी पाठवला आहे.

संबंधीतावर तत्काळ कारवाईची जिल्हा परिषदेला सूचना

व्हसपेठ ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. यासंबंधीचे सहा सदस्यांना कल्पना देण्याबाबतची सूचना डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिली आहे.

Web Title: Opposition interferes in Sarpanch decisions on the strength of majority, membership of six people of Vaspeth Gram Panchayat cancelled in Sangli