Sangli: उसाची ट्रॉलीखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू, प्रसंगावधान राखून चार मुलींना वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 11:48 IST2025-01-23T11:47:50+5:302025-01-23T11:48:49+5:30
हा प्रकार पाहून भेदरलेल्या मुलींनी आरडाओरड केला

Sangli: उसाची ट्रॉलीखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू, प्रसंगावधान राखून चार मुलींना वाचवले
सांगली : कर्नाळ ते सांगली रस्त्यावर उसाच्या ट्रॉलीची पीन निसटून ट्रॉली वेगाने मागे येऊन शाळकरी मुलींना घेऊन घराकडे चालत निघालेल्या अभिजीत निवृत्ती पाटील (वय ४२, रा. सांगली रस्ता, कर्नाळ, ता.मिरज) यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत घराकडे निघालेली मुलगी, शेजारील तीन मुलींना त्यांनी प्रसंंगावधान राखून बाजूला ढकलले. त्यामुळे चौघी जणी बचावल्या. थरकाप उडविणाऱ्या अपघातात अभिजीत यांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
अभिजीत पाटील हे हॉटेलमध्ये मदतनीस म्हणून काम करत होते. पत्नी, दोन मुली, आई-वडिलांसह ते सांगली रस्त्यावर राहत होते, तर भाऊ पुण्यात नोकरीस आहे. अभिजीत हे सायंकाळी कर्नाळ हायस्कूल, कर्नाळमध्ये शिकणाऱ्या त्यांच्या मुलीला व शेजारील तीन मुलींना घेऊन चालत नेहमी घरी आणत होते. बुधवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ते मुलीला व शेजारील तीन मुलींना घेऊन घरी येत होते. कर्नाळमधील खणीपासून ते सांगलीच्या दिशेने येत असताना त्यांनी मुलीचे दप्तर, डब्याची पिशवी स्वत:कडे घेतली होती. चारही शाळकरी मुली त्यांच्या डाव्या बाजूला बाजूपट्टीवरून चालत होत्या.
त्याच वेळी सांगलीकडे निघालेल्या उसाच्या ट्रॅक्टर, ट्रॉलीपैकी मागील ट्रॉलीची पीन निघाली. त्यामुळे ट्रॉली पुढच्या ट्रॉलीपासून वेगळी होऊन वेगाने मागे आली. चालत निघालेल्या अभिजीत मागे येणारी ट्रॉली पाहून तत्काळ धोका लक्षात आला. त्यांनी मुलींच्या अंगावर ट्रॉली येऊ नये, म्हणून त्यांना बाजूला ढकलले, परंतू या प्रयत्नात ट्रॉलीची धडक बसल्यानंतर चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हा प्रकार पाहून भेदरलेल्या मुलींनी आरडाओरड केला. रस्त्यावरील नागरिक तत्काळ धावले. तोपर्यंत अभिजीत यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कर्नाळ परिसरात हळहळ
अभिजीत पाटील यांना चार शाळकरी मुलींना वाचविताना स्वत:चा जीव गमवावा लागला. या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. अभिजीत यांच्या अपघाती मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे वडील निवृत्त मुख्याध्यापक आहेत.