Sangli News: उसाचा फड पेटवताना एकाचा मृत्यू, एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:04 IST2025-12-15T17:04:17+5:302025-12-15T17:04:37+5:30
मोठ्या प्रमाणात वारा वाहू लागला; त्यामुळे आग भडकली

Sangli News: उसाचा फड पेटवताना एकाचा मृत्यू, एकजण जखमी
शिराळा : वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा) येथे उसाचा फड पेटविला असताना आग दुसऱ्याच्या शेतात जाऊ नये म्हणून प्रयत्न करताना दोन सख्ख्या वृद्ध शेतकरी भावांपैकी एकाचा मृत्यू झाला; तर मोठा भाऊ गंभीर जखमी आहेत.
आनंदा रामचंद्र मोरे (वय ७०) असे मृताचे, तर वसंत रामचंद्र मोरे (७५) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. सदर घटना शनिवारी, दि. १३ रोजी दुपारी सहाच्या दरम्यान घडली. मात्र, आनंद मोरे यांचा मृत्यू झाल्याचे रविवारी सकाळी नऊच्या दरम्यान उघडकीस आले.
याबाबत माहिती अशी की, या गावाच्या हद्दीत मोरे यांचे चार ते पाच गुंठे क्षेत्र आहे. येथील ऊस गाळपासाठी गेल्याने आनंदा मोरे व वसंत मोरे हे दोघे भाऊ शेतातील पाला पेटवण्यासाठी गेले. शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान उसाचा फड पेटविला. यावेळी वसंत मोरे हे आनंदा मोरे यांना सांगून फडातून बाहेर पडत हाेते; तर आनंदा हे फडातच होते. वसंत मोरे बाहेर पडत असतानाच मोठ्या प्रमाणात वारा वाहू लागला; त्यामुळे आग भडकली. त्यामुळे त्यांना हात, पाय, तोंड, आदी शरीरावर भाजले.
त्यांनी आरडाओरडा केल्याने गोरख माने, आदींनी येऊन त्यांना वाचवले व शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या दरम्यान आनंदा मोरे हे रात्री उशिरापर्यंत घरी आले नाहीत, म्हणून त्यांचा शोध घेतला; मात्र ते आढळून आले नाहीत.
रविवारी सकाळी नऊच्या दरम्यान त्यांची सायकल शेताच्या बाजूला उभी केलेली दिसली. यावरून शोधाशोध केली असता शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पेटकर, सर्फराज मगदूम यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर आनंदा मोरे हे मृत झाल्याचे समजल्यावर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.
आनंदा मोरे यांच्या पत्नी काही वर्षांपूर्वी मृत झाल्याने व त्यांना आपत्य नसल्याने ते वसंत मोरे यांच्याबरोबरच राहत होते. या घटनेची वर्दी शरद रामचंद्र मोरे यांनी शिराळा पोलिस ठाण्यात दिली असून, पुढील तपास हवालदार सुनील पेटकर करीत आहेत.