Sangli: आटपाडीत व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एकजण ताब्यात, अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची व्याप्ती वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:33 IST2025-07-26T14:32:28+5:302025-07-26T14:33:33+5:30
पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे चौकशी

Sangli: आटपाडीत व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एकजण ताब्यात, अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची व्याप्ती वाढली
आटपाडी : तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात चौघांना अटक झाल्यानंतर एका व्हायरल व्हिडीओमुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये ‘या प्रकरणातून सुटायचे असेल, तर ५० हजार रुपये द्यावे लागतील, मी मध्यस्थी करतो’, असा संवाद आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पोलिसांची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. व्हायरल क्लिपमधील संभाषणात काहींची नावे असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती.
या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी आटपाडी पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांची भीती दाखवून आर्थिक मागणी केल्याच्या प्रकाराची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. अजून दोन व्यक्तींचे जबाब घेणे बाकी आहे. – विपुल पाटील, पोलिस उपअधीक्षक, विटा