वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून एक ठार, दोघे जखमी; सांगली जिल्ह्यात हातनोलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 15:34 IST2022-04-11T14:44:12+5:302022-04-11T15:34:53+5:30
तासगाव : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात बहुतांशी ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सांगली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळी ...

वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून एक ठार, दोघे जखमी; सांगली जिल्ह्यात हातनोलीतील घटना
तासगाव : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात बहुतांशी ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सांगली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यामुळे झाडे-झुडपे मुळासह उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या. दरम्यान तासगाव तालुक्यात दुर्दैवी घटना घडली. वाऱ्यामुळे भिंत कोसळून एक ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. काल, रविवारी (दि.१०) ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत कमल नारायण माळी (वय ७०) या वृद्धेचा मृत्यू झाला, तर तिचा पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल, रविवारी सायंकाळपासून जोरदार वादळी वारे सुटले होते. त्यातच पावसाला सुरूवात झाली. माळी कुटुंब धामणी रस्त्यावरील मळ्यात कच्च्या सिमेंट विटांचे पत्र्याचे घर आहे. रविवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्याने त्यांच्या घरावरील छत उडून गेले. तर घराची एक भिंत कमल आणि दीपक याच्या अंगावर पडली. त्यात कमल यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर नारायण व दीपक हे दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमी दोघांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश दिले.