सांगलीत एसटी बसची मोपेडला धडक, एक ठार; वाचविण्याच्या प्रयत्नात बस झाडावर आदळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:00 IST2025-07-21T12:58:35+5:302025-07-21T13:00:10+5:30
महिनाभरात दुसरा बळी

सांगलीत एसटी बसची मोपेडला धडक, एक ठार; वाचविण्याच्या प्रयत्नात बस झाडावर आदळली
सांगली : येथील सिव्हिल चौक ते बसस्थानक रस्त्यावर मराठा समाज संस्थेसमोर एसटी बस आणि मोपेड यांच्यात धडक होऊन मेहबूब फकरुद्दीन शेख (वय ६५, रा. शंभरफुटी रस्ता, रमामातानगर) हे ठार झाले. रविवारी सकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर एसटी झाडावर आदळल्यामुळे झाड तुटून पडल्याची घटना घडली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
मेहबूब शेख हे सुतार काम करतात. रविवारी सकाळी ते मोपेड (एमएच १० एएल १०७६) घेऊन घराबाहेर पडले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास बसस्थानक रस्त्यावर मराठा समाज संस्थेसमोरून जात असताना एसटी बस (एमएच १४ बीटी ४८५७) आणि मोपेड यांच्यात धडक झाली. या धडकेत मेहबूब शेख हे गंभीर जखमी झाले. यावेळी एसटी चालकाने धडक बसण्यापासून वाचवण्याचा प्रयत्नात झाडावर एसटी घातली. धडकेनंतर झाड मुळाजवळून तुटून पडले.
दरम्यान, जखमी मेहबूब यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताबाबत मृत मेहबूब शेख यांचा मुलगा उमर शेख यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महिनाभरात रस्त्यावर दुसरा बळी
सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावर जय मातृभूमी मंडळाजवळ महिन्यापूर्वी एसटी बसच्या धडकेत तरुणी जागीच चिरडून ठार झाली होती. त्यानंतर पुन्हा याच ठिकाणापासून काही अंतरावर अपघातात वृद्ध झाल्याची घटना घडली.