Sangli: तरुणाच्या खूनप्रकरणी एकाला जन्मठेप; प्रेयसीला त्रास देत असल्याच्या कारणावरून महापुरात दिलं होत ढकलून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:07 IST2025-10-29T18:05:25+5:302025-10-29T18:07:54+5:30
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

Sangli: तरुणाच्या खूनप्रकरणी एकाला जन्मठेप; प्रेयसीला त्रास देत असल्याच्या कारणावरून महापुरात दिलं होत ढकलून
शिरगुपी : प्रेयसीला त्रास देत असल्याच्या कारणावरून दीपक चिदानंद बाने या तरुणाचा कृष्णा नदीच्या महापुरात ढकलून देऊन खून केल्याप्रकरणी एकाला अथणी येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रियाज सिराज मुजावर असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १२ ऑगस्ट २०२० रोजी घडली होती.
याबाबत माहिती अशी की, मृत दीपक बाने हा १२ ऑगस्ट २०२० रोजी बेपत्ता झाला होता. त्याच्या आईने कागवाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा शोध घेताना पोलिसांनी आरोपी रियाज मुजावर याने त्याचा खून केल्याची माहिती मिळाली. आरोपी मुजावर हा कुडची येथील एका रुग्णालयात कर्मचारी होता. त्याच्या प्रेयसीला दीपक त्रास देत होता. यामुळे तो दीपकवर चिडून होता. त्यांच्या वादही झाला होता.
१२ ऑगस्ट रोजी सव्वाआठ वाजता रियाज हा दीपकला कुडची रेल्वे पुलावर घेऊन गेला. तिथे त्याला दारू पाजली. यावेळी कृष्णा नदीला पूर आलेला होता. त्याने दीपकला पुराच्या पाण्यात फेकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रिजाय मुजावर याला अटक करून अथणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश इराना ई.एस. यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने रियाज मुजावर याला जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.