ऑक्टोबर हीटचा जनतेला 'ताप'; सांगलीत संसर्गजन्य आजारांचा विळखा, रुग्णालयांमध्ये गर्दी
By संतोष भिसे | Updated: October 8, 2025 16:52 IST2025-10-08T16:51:53+5:302025-10-08T16:52:13+5:30
संतोष भिसे सांगली : पावसाने विश्रांती घेताच ऑक्टोबर हीटचा तडाखा बसायला सुरुवात झाली आहे. दिवसा कडक उन्हे आणि रात्री ...

ऑक्टोबर हीटचा जनतेला 'ताप'; सांगलीत संसर्गजन्य आजारांचा विळखा, रुग्णालयांमध्ये गर्दी
संतोष भिसे
सांगली : पावसाने विश्रांती घेताच ऑक्टोबर हीटचा तडाखा बसायला सुरुवात झाली आहे. दिवसा कडक उन्हे आणि रात्री गार वारे यामुळे अवघा जिल्हा तापाने फणफणला आहे. सर्दी, पडसे, खोकला अंगदुखी आणि कणकण अशा आजारांमुळे रुग्णालये फुल्ल झाली आहेत.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसची वाढ नोंदविली गेली आहे. पाऊस थांबला, तरी सर्व पाण्याची तळी साचून आहेत. त्यामुळे डासांचा उद्रेक झाला आहे. परिणामी डेंग्यूसदृश तापाचे रुग्णही आढळत आहेत.
अशी घ्या त्वचेची काळजी
या दिवसांत सकाळी आणि रात्री त्वचेसाठी हलका मॉइश्चरायझर घेणे आवश्यक आहे. कडक पाण्याने अंघोळ करू नका. भरपूर पाणी प्यावे. ऑक्टोबर हीटमध्ये त्वचा जळण्यापासून वाचविण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा. नारळाचे तेल त्वचेला लावावे. पुरळ किंवा खाज वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मुलांच्या प्रकृतीसाठी हे महत्वाचे
मुलांच्या संवेदनशील प्रकृतीसाठी सध्याचा कालावधी धोकादायक आहे. दिवसाची कडक उन्हे आणि रात्रीचा गारठा अशा हवामानाशी मुले जुळवून घेऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना उबदार वातावरणात ठेवणे, गरम अन्न देणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. संसर्गजन्य आजारही वाढत असल्याने त्यांना गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळावे.
सर्दी, खोकल्यापासून बचाव महत्त्वाचा
हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि अंगदुखीचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे दिवसा थेट उन्हात फिरणे आणि रात्री उशिरापर्यंत गार वाऱ्यात राहणे टाळावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ पूर्णत: वर्ज्य करावेत. विषाणूजन्य आजारांपासून बचावासाठी गर्दीत जाणे शक्यतो टाळावे. रात्री गार वातावरणात कोमट पाणी पिणे फायद्याचे ठरते.
सिव्हिलची ओपीडी वाढली
सोमवारी आणि मंगळवारी सांगली व मिरज शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले. यातील बहुतांश रुग्ण कणकण आलेले होते. ताप, थंडी, खोकला आणि अंगदुखी असा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवसा ऊन, सायंकाळनंतर गार वारे
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसा चांगली उन्हे पडत आहेत. तर सायंकाळनंतर गार वारे वाहत आहेत. या विरोधाभासी हवामानामुळे तापाचे रुग्ण वाढत आहेत. विशेषत: लहान मुलांसाठी हे हवामान अत्यंत प्रतिकूल आहे. त्यांना उबदार खोलीत ठेवावे, गरम अन्न द्यावे आणि बाहेरचे खाद्यपदार्थ देऊ नयेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
बदलत्या हवामानामुळे विषाणूजन्य आजार वाढत आहेत. पावसाळ्यातील दूषित वातावरणामुळे आजारांचा त्रास होऊ शकतो. सध्या साथीचे रोग कोठेही नाहीत, मात्र नागरिकांनी कोणताही आजार अंगावर काढू नये. सर्व आरोग्य केेंद्रांत औषधांसह अत्यावश्यक उपचार सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णांनी तेथे उपचार घ्यावेत. - डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्याधिकारी