'शक्तिपीठ'च्या हरकती फेटाळल्या, सांगलीत नोटिसांची शेतकऱ्यांनी केली होळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:52 IST2025-09-10T15:51:37+5:302025-09-10T15:52:01+5:30
शंखध्वनी आंदोलन : शासनाविरोधात निदर्शने

'शक्तिपीठ'च्या हरकती फेटाळल्या, सांगलीत नोटिसांची शेतकऱ्यांनी केली होळी
सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठीच्या शेतकऱ्यांच्या हरकती प्रांताधिकारी यांनी फेटाळल्या आहेत. यासंबंधीच्या नोटिसा शेतकऱ्यांना मिळाल्या आहेत. या नोटिसांची शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी केली. शासनाच्या नावाने शंखध्वनी आंदोलनही शेतकऱ्यांनी करून राज्य सरकारचा निषेध केला.
शक्तिपीठ महामार्गबाधित शेती बचाव कृती समितीचे पदाधिकारी उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावाने शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.
वाचा- शक्तिपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा, राजू शेट्टींचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन
अखिल भारतीय किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा राज्य सरकारचा आहे. मात्र शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गाचे काम रद्दच झाले पाहिजे. प्रसंगी शेतकरी कुटुंबीयासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनास बसणार आहे. राज्य सरकारने जनतेला नको असलेला शक्तिपीठ महामार्ग त्वरित रद्द करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना मातीत घालत आहे. मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सरकारचे षडयंत्र हाणून पाडू. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबला पाहिजे. अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनात शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी प्रभाकर तोडकर, अजित हळीगले, विष्णू पाटील, उमेश एडके, अधिक पाटील, रघुनाथ पाटील, रवींद्र साळुंखे, नितीन झांबरे, सुनील पवार, विक्रम हारूगडे, राजाराम माळी, रमेश एडके, अधिक शिंदे, श्रीकांत पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय पाटील, राजू एडके, प्रमोद एडके, पांडुरंग मिसळ आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भांडवलदारांच्या सोयीसाठी शक्तिपीठ महामार्ग : सतीश साखळकर
शक्तिपीठ महामार्ग करण्याची राज्यातील एकाही शेतकऱ्यांची मागणी नाही. सर्वसामान्य नागरिकांमधूनही मागणी नाही. तरीही शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. भांडवलदारांच्या हितासाठी हजार शेतकऱ्यांना भूमीहिन करत आहे. या शेतकऱ्यांचा उद्रेकच शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडतील, असा इशारा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला.