जुन्या भांडणाचा राग; सांगलीतील शासकीय रुग्णालयामधील परिचारिकेला बेदम मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:20 IST2025-08-06T14:20:01+5:302025-08-06T14:20:15+5:30
चांदीच्या शिक्क्यांसह ५१ हजारांचा ऐवजही लंपास

जुन्या भांडणाचा राग; सांगलीतील शासकीय रुग्णालयामधील परिचारिकेला बेदम मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हे
सांगली : सांगलीतील शासकीय रुग्णालयातील परिचारिका विद्या सतीश जाधव (वय ३९, रा. पोळ मळा, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. संशयितांनी त्यांच्या घरातून ५१ हजार रुपयांचा ऐवजही लंपास केला.
जाधव यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अजितासिंग कापसे, माही कापसे, रजनीसिंग, सतबिरसिंग व पेपेसिंग (सर्व. रा. पोळ मळा, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) यांच्याविरोधात गुन्हे नोंदविले. मारहाणीचा प्रकार १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान जाधव यांच्या राहत्या घरी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विद्या व संशयित अजितासिंग कापसे यांचे यापूर्वी भांडण झाले होते.
त्याचा राग मनात धरुन अजितासिंग ही ७ एप्रिल रोजी चार ते पाच संशयितांना सोबत घेऊन विद्या यांच्या घरात आली. संशयितांपैकी पेपेसिंग व रजनीसिंग यांनी विद्या यांना धरुन ठेवले. अजितासिंग व माही यांनी विद्या यांना चप्पलने मारहाण केली. रजनीसिंग व पेपेसिंग यांनी विद्या यांना ‘तुला ठेवतच नाही’ असे धमकावत शिवीगाळ केली.
संशयितांच्या मारहाणीला घाबरुन विद्या या शयनगृहात जाऊन लपल्या, त्यावेळी संशयितांनी शयनगृहाला बाहेरुन कडी लावली. घरातील साहित्याची नासधूस केली. देवघरातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड व १००० रुपये किमतीचे चांदीचे दोन शिक्के चोरून नेले. यापैकी एक शिक्का सिनर्जी रुग्णालय नोंदवलेला व दुसरा कोरा होता.
विद्या यांनी पोलिसांत तक्रार दिली, त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता ३०५, १८९(२), १८९(३), १२६(२), ३३३, ३२४(४), ११५(२), ३५२, ३५१(२) नुसार गुन्हे दाखल केले आहेत.