Sangli Crime: शहरातच नव्हे ग्रामीण भागातही नशेखोरांचे अड्डे, पोलिसांचा अंकुश राहिला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 15:34 IST2025-02-01T15:34:21+5:302025-02-01T15:34:37+5:30
गांजा, औषधी गोळ्या, इंजेक्शनची सर्वत्र नशा

Sangli Crime: शहरातच नव्हे ग्रामीण भागातही नशेखोरांचे अड्डे, पोलिसांचा अंकुश राहिला नाही
घनशाम नवाथे
सांगली : पडक्या इमारती, मोकळी मैदाने आणि दुर्लक्षित ठिकाणी जागोजागी दारूच्या बाटल्या, ग्लास पडलेले दिसतात. याच कचऱ्यातून गांजा ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोनची पाकिटे, इंजेक्शनच्या सिरिंज, नशेच्या गोळ्याची पाकिटे डोकावताना दिसतात. केवळ शहरातच नव्हे ग्रामीण भागातही नशेखोरांचे अड्डे निर्माण झाले आहेत. हे अड्डे उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी पोलिस प्रामाणिकपणे पार पाडत नाहीत. त्यामुळे नशेबाजांची आणि त्यांच्या अड्ड्यांची संख्या वाढतच आहे.
जर नशेचे पदार्थ सहजपणे उपलब्ध होत असतील तर त्याकडे अनेकजण आकर्षित होतात. गांजा, नशेच्या गोळ्या, इंजेक्शन सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागातील अड्ड्यांवर सकाळपासून नशेबाज नशेत तर्रर्र होऊन पडतात. नशेबाजांच्या अड्ड्यावर जाऊन त्यांना विचारण्याचे कोणी धाडस करत नाही. कारण नशेबाज थेट अंगावर धावून येतात. पडक्या इमारती, मोकळी मैदाने, झाडेझुडपे, नदीकाठचा परिसर, बंद पडलेल्या शाळा, स्मशानभूमीचा परिसर आदी ठिकाणी वर्दळ कमी असल्यामुळे नशेखोरांनी येथे अड्डे बनवले आहेत.
पोलिसांकडून सर्व ठिकाणी गस्त घातली जात नाही. त्यामुळे नशेबाज बिनधास्तपणे नशा करताना दिसून येतात. गांजा ओढणाऱ्यांवर पोलिसांकडून सांगली, मिरजेत अधून-मधून कारवाई केली जाते. परंतु, हे प्रमाण नगण्य आहे. त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक नशेखोरांचे अड्डे निर्माण झाले आहेत. पोलिस कारवाईत सातत्य नसल्यामुळे अनेकांचे फावले आहे. त्यामुळे नशेखोरांच्या अड्ड्यांवर बाटल्यांचा खच वाढतच चालला आहे. त्यासोबत गांजा ओढण्यासाठीचे फिल्टर पाईप, कोन, इंजेक्शन सिरिंज यांची संख्याही वाढतच चालली आहे.
विट्यात अनेक ठिकाणी ‘दम मारो दम’
विट्यातील नगरपालिकेच्या बंद पडलेल्या जलतरण तलावात दारूच्या बाटल्या, रिकामे ग्लास यांचा अक्षरश: खच पडलेला दिसून येतो. याचठिकाणी इंजेक्शनच्या सिरिंज कशा येऊन पडल्या आहेत, याचा आता पोलिसांनीच शोध घेतला पाहिजे. त्याचबरोबर गांजा ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फिल्टर पाईप, कोनचे बॉक्सही पडले आहेत. तसेच मार्केट यार्ड परिसरातील स्मशानभूमी, खानापूर रस्ता परिसरातील स्मशानभूमी आदी अनेक ठिकाणी नशेबाजांनी अड्डे बनवले आहेत. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते. त्यामुळे सर्वत्र नशेबाजांनी केलेला कचरा वाढतच चालला आहे.
सांगली, मिरजेत ठिकाणे
सांगलीत शामरावनगर परिसरातील काटेरी झुडपे, नदीकाठचा परिसर, शहराजवळील शेती, मोकळी क्रीडांगणे, पडक्या इमारती येथे नशेबाजांचे जागोजागी अड्डे आहेत. मिरजेतून गांजाची सर्वत्र तस्करी होत असल्यामुळे येथेही जागोजागी अड्डे निर्माण झाले आहेत. तर पोलिसांची कारवाई मात्र बोटावर माेजण्याइतपतच दिसून होते. सांगली, मिरज, विटासह जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात हेच चित्र दिसून येते.
ड्रग्ज ‘पेडलर’वर कारवाई हवी
वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज विकणारे अनेक ‘पेडलर’ मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. त्यांच्यावर थेट कारवाई करून त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्याची गरज आहे. सातत्याने त्यांच्यावर कारवाई केली तर आळा बसू शकेल. ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाई झाली तर सहजपणे कोणाला उपलब्ध होणार नाही. परिणामी ड्रग्जची नशा करणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल.
कारागृहात गांजा पुरवण्याचे धाडस
गांजा विक्रेत्यांवर पोलिस दलाचा अंकुश राहिला नाही. त्यामुळे अधून-मधून जेलमध्ये आरोपींना गांजा पुरवण्याचे धाडस अनेकजण करतात. जर जेलमध्ये गांजा पुरवण्यासाठी धाडस करत असतील तर इतर ठिकाणी ते राजरोसपणे गांजा विक्री करत असतील यात शंकाच नाही.