Sangli: कवठेमहांकाळमधील लूटप्रकरणी धागेदोरे मिळेना, इन्कम टॅक्सचे अधिकारी असल्याचे सांगत कोट्यवधीचा ऐवज केला लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:41 IST2025-09-17T15:41:16+5:302025-09-17T15:41:50+5:30
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध : पोलिसांची पाच पथके रवाना

Sangli: कवठेमहांकाळमधील लूटप्रकरणी धागेदोरे मिळेना, इन्कम टॅक्सचे अधिकारी असल्याचे सांगत कोट्यवधीचा ऐवज केला लंपास
कवठेमहांकाळ (जि.सांगली) : कवठेमहांकाळ शहरातील डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरातून अज्ञात चार चोरट्यांनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत एक कोटी वीस हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याप्रकरणी पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत. कवठेमहांकाळ पोलिसांची दोन व स्थानिक गुन्हे शाखा सांगली यांची तीन अशी पाच पथके चोरट्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.
वाचा: ‘स्पेशल-२६’ चित्रपटाचे अनुकरण करीत टाकला छापा, कवठेमहांकाळमधील डॉक्टरच्या लुटीचा 'असा' उघडकीस आला बनाव
या गुन्ह्याचा छडा लवकरात लवकर लावला जाईल, असे जत विभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले व कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी सांगितले. कवठेमहांकाळ येथील काळे प्लॉट येथे डॉ. जे. डी. म्हेत्रे यांचा दवाखाना व निवासस्थान आहे. त्यांच्या घरी रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून अज्ञात चार चोरट्यांनी १५ लाख ६० हजार रोख रकमेसह १ कोटी २० हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत म्हेत्रे यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात तीन पुरुष व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.