बेंगळूरू-मुंबई दरम्यान मिरजमार्गे नवी सुपरफास्ट एक्स्प्रेस धावणार, मुंबईसाठी आणखी एक गाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:36 IST2025-10-27T14:35:28+5:302025-10-27T14:36:04+5:30
रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील,

बेंगळूरू-मुंबई दरम्यान मिरजमार्गे नवी सुपरफास्ट एक्स्प्रेस धावणार, मुंबईसाठी आणखी एक गाडी
सांगली : मागील अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या बेंगलुरू - मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसला अखेर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संदर्भात नुकतीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या बैठकीत या गाडीला रेल्वेमंत्र्यांनी हिरवा कंदील दर्शविला.
यामुळे बेळगावहून मिरज-सांगलीमार्गेमुंबई आणि बेंगळुरुसाठी आता आणखी एक सुपरफास्ट एक्स्प्रेस मिळणार आहे. मागील ३० वर्षांपासून या दोन शहरांना जोडणारी उद्यान एक्स्प्रेस सोलापूर-गुंटकलमार्गे धावत आहे. आता या नव्या एक्स्प्रेसद्वारे बेळगाव, हुबळी, धारवाड, हावेरी, दावणगेरी हे जिल्हेही जोडले जाणार आहेत, शिवाय बेळगावमधून नवी एक्स्प्रेस मुंबईसाठी उपलब्ध होणार आहे.
मिरज, सांगलीकरांनाही या निमित्ताने मुंबईसाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाली आहे. सध्या मुंबईला जाणाऱ्या सर्वच एक्स्प्रेस गाड्या बाराही महिने हाउसफुल्ल असतात. या गाड्यांचे तिकीट मिळणे मुश्कील असते. सांगली, मिरजेसाठी या गाड्यांना मर्यादित कोटा असल्याचा फटका बसतो.
बेंगलुरूमधून मुंबईसाठी मिरज-सांगलीमार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्येही मिरजेसाठी मोजकाच कोटा आहे. मात्र, नव्या सुपरफास्ट एक्स्प्रेसमुळे हा कोटा काही प्रमाणात वाढणार आहे. ही गाडी केव्हापासून धावणार? तिचे वेळापत्रक कसे असेल, याचा तपशील रेल्वेने अद्याप जाहीर केलेला नाही.
नव्या गाडीमुळे सांगली-मिरजेच्या प्रवाशांची सोय होणार आहे. सध्याच्या गर्दीवर उपाय म्हणून ही गाडी उपयुक्त ठरेल. - किशोर भोरावत, सदस्य, मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती.