Sangli Crime: दमदाटी केल्याने शेजाऱ्याने सुपारी देऊन टाकला उटगीतील ‘तो’ दरोडा; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:14 IST2025-07-25T17:14:11+5:302025-07-25T17:14:50+5:30
जाताना शेळ्या चोरल्या

संग्रहित छाया
सांगली : उटगी (ता. जत) येथील वस्तीवर दरोडा टाकून दोघा भावांना मारहाण करून दहा लाखांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पर्दाफाश केला. सुरेश मनोहर काळे (वय ५५, रा. सांगली रस्ता तांडा, जत), पप्पू सुरेश परीट (वय ५५, रा. परीट वस्ती, उटगी) या दोघांना अटक केली. आरोपी परीट याला फिर्यादीच्या भावाने एका प्रकरणात दमदाटी केल्यामुळे त्याने सुपारी देऊन दरोडा टाकायला लावल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उटगी येथील तेली वस्तीवर राहणाऱ्या चांदसाब बाबासाब मुल्ला यांच्या घरावर दि. २१ रोजी मध्यरात्रीनंतर दोन वाजता आठ जणांच्या टोळीने दरोडा टाकला. मुल्ला यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यामुळे मुल्ला कुटुंब जागे झाले. तेव्हा चांदसाब आणि भाऊ साहेबलाल या दोघांना दरोडेखोरांनी मारहाण करून रोकड, सोन्याचे दागिने असा सुमारे दहा लाखांचा ऐवज लुटून नेला.
याबाबत चांदसाब यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा दरोडा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकाला छडा लावण्याचे आदेश दिले होते. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक स्वतंत्र पथक स्थापन केले होते.
सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी नागेश खरात, संदीप नलावडे यांना जत येथील सुरेश मनोहर काळे याने साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याची माहिती मिळाली. काळे याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने उटगी येथील परिचित पप्पू परीट याच्या सांगण्यावरून दरोडा टाकल्याची कबुली दिली.
पथकाने पप्पूला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सांगितले की, गावातील एका प्रकरणात साहेबलाल मुल्ला याने विरोध केला होता. तसेच त्याला दमदाटी केली होती. त्यामुळे पप्पूला त्याचा बदला घेऊन धडा शिकवायचा होता. त्यासाठी त्याने सुरेश काळे याला दरोडा टाकण्याची सुपारी दिली. काही पैसे देऊन घरात घुसून दरोडा टाकण्यास सांगितले. त्यानुसार काळे याने त्याच्या साथीदारांना बोलवून दरोडा टाकल्याचे तपासात स्पष्ट झाले. दोघांना ताब्यात घेऊन उमदी पोलिसांच्या ताब्यात दिले. काळे याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, उमदीचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे, गुन्हे अन्वेषणचे अनिल कोळेकर, अमर नरळे, सतीश माने, दऱ्याप्पा बंडगर, सागर लवटे, संदीप गुरव, महादेव नागणे, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे, आमसिद्ध खोत, सोमनाथ गुंडे, उदय माळी, संदीप गुरव, अमिरशा फकीर, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, गणेश शिंदे, सुशांत चिले यांच्या पथकाने कारवाई केली.
जाताना शेळ्या चोरल्या
उटगी येथे दरोडा टाकल्यानंतर मोटारीतून पळून जाताना वाटेत बनाळी (ता. जत) गावातील एका वस्तीवरून शेळ्या चोरून नेल्याचे काळे याने सांगितले. त्यानुसार हा गुन्हाही दाखल झाला आहे.
दरोडेखोर काळे रेकॉर्डवरील
दरोडेखोर काळे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने परजिल्ह्यातील साथीदारांना बोलावून दरोडा टाकल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.