जयंत पाटलांचे मौन अन् करेक्ट कार्यक्रम, मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची पूर्वपरीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 14:07 IST2022-12-12T14:06:48+5:302022-12-12T14:07:27+5:30
बहुतांशी ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीतीलच गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत

जयंत पाटलांचे मौन अन् करेक्ट कार्यक्रम, मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची पूर्वपरीक्षा
अशोक पाटील
इस्लामपूर : वाळवा तालुका आणि शिराळा विधानसभा मतदार संघातील ४८ गावांतील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. यातील बहुतांशी ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. त्यामुळेच जयंत पाटील थेट सक्रिय नाहीत. ही निवडणूक म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्वपरीक्षाच म्हणावी लागेल.
वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवटली आहे. याठिकाणी शहरभाग वगळता ग्रामीण भागात भाजप, काँग्रेस पक्षांची ताकद नगण्य आहे. राष्ट्रवादी विरोधात काही मोजकेच गट सक्रीय आहेत.
बहुतांशी ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीतीलच गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील थेट प्रचारात नाहीत. परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतच काहींचा कार्यक्रम करण्याची खेळी मात्र पाटील यांनी आखली आहे. या निवडणुकीत दिग्गज नेते प्रचारातून सक्रिय दिसत नाहीत. यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भूमिका गूलदस्त्यात ठेवल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची फौज सक्रिय आहे. बहुतांशी ग्रामपंचायतींवर सर्वच पक्ष एकमेकांच्या सोयीने आघाडी करून लढत आहेत. तर काही गावांत भाऊबंदकीमध्येच लढती दिसत आहेत. सदस्यापेक्षा आता थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. त्यामुळेच सरपंचपदासाठी घोडेबाजार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे बोलले जात आहे.