कोल्हापूरनंतर सांगलीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, चर्चांना मिळाला पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:12 IST2025-11-13T18:08:30+5:302025-11-13T18:12:45+5:30
Local Body Election: गेले तीन-चार दिवस आघाड्या होण्यासंदर्भात बैठका निष्फळ ठरत होत्या

संग्रहित छाया
जत : जत नगरपरिषद निवडणुकीसाठी गेले तीन-चार दिवस आघाड्या होण्यासंदर्भात बैठका होत होत्या. पुन्हा बैठका निष्फळ ठरत होत्या. अखेर दोन राष्ट्रवादीची व बहुजन समाज पक्ष अशा तिघांची मिळून आघाडी झाल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते विलासराव जगताप व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते सुरेश शिंदे यांनी आघाडी केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
विलासराव जगताप म्हणाले, बुधवारी सायंकाळी दोन्ही गटात चर्चा होऊन आघाडी करण्याचे ठरविले असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी सुरेश शिंदे यांचे नाव निश्चित केले. दोन जागा बहुजन समाज पक्षाला देण्याचे ठरले असून बसपा पक्षाचे दोन उमेदवार त्यांच्या हत्ती या चिन्हावर लढवतील, इतर २३पैकी २१ उमेदवार घड्याळ या चिन्हावर उमेदवार निवडणूक लढवतील, असे जगताप यांनी जाहीर केले.
वाचा : भाजप बोलेना म्हणूनच शरद पवार पक्षाशी आघाडी - हसन मुश्रीफ
सुरेश शिंदे म्हणाले, दोन राष्ट्रवादीत आघाडी निश्चित ठरली असून आम्ही दोघेही एकदिलाने प्रचार यंत्रणा राबवून सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या दृष्टीने ताकद लावू. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, अप्पा पवार, प्रमोद सावंत, संग्राम जगताप, मच्छिंद्र वाघमोडे, इम्रान गवडी, शिशिकांत काळगी, शरणाप्पा अक्की, स्वप्नील शिंदे, दीपक पाटणकर, प्रकाश देवकुळे, अभिजित कणसे, नसीर मुल्ला, मकसूद नगरजी, अनाप्पा माळी, तानाजी व्हनखंडे, सचिन मदने उपस्थित होते.
चर्चांना पूर्णविराम
सांगली जिल्ह्यात प्रथमच जत येथे दोन राष्ट्रवादी गटाची आघाडी झाली आहे. गेले चार - पाच दिवस आघाडीबाबत सारख्या वावड्या उठत होत्या. अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे आघाडीबाबत ठरल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.