Sangli: दुचाकी घसरून पुराच्या पाण्यात पडले, दोघा कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता मायलेकास वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:56 IST2025-09-30T18:54:46+5:302025-09-30T18:56:29+5:30
हिंगणगाव येथे घडला भीषण प्रकार

Sangli: दुचाकी घसरून पुराच्या पाण्यात पडले, दोघा कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता मायलेकास वाचवले
कवठेमहांकाळ : हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे सोमवारी सकाळी भीषण प्रकार घडला. जोरदार प्रवाह असलेल्या अग्रणी नदीच्या पुलावरून दुचाकी घसरून आई व मुलगा पुराच्या पाण्यात पडले. मात्र, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या आरोग्य विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता पुराच्या प्रवाहात उडी घेत त्यांचा जीव वाचवला आहे.
विजय आप्पासाहेब माळी (वय २८) व त्यांची आई शोभा आप्पासाहेब माळी (वय ५०, रा. खंडेराजुरी, ता. मिरज) या मायलेकास वाचवले आहे. या घटनेत शोभा माळी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर कवठेमहांकाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
विजय माळी हे दुचाकीवरून आईसह खंडेराजुरीतून कवठेमहांकाळकडे येत होते. हिंगणगाव येथील अग्रणी पुलाच्या मधोमध आल्यावर अचानक पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दुचाकी घसरून दोघे नदीत कोसळले. क्षणभरात दुचाकीसकट ते पाण्यात वाहत गेले.
यावेळी तिथेच उपस्थित नगरपंचायतीच्या आरोग्य विभागातील कर्मचारी गोविंद थोरवे व विनायक कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न करता पुराच्या पाण्यात उडी घेतली. त्यांनी मोठ्या शिताफीने विजय माळी आणि त्यांची आई शोभा माळी यांना बाहेर काढले. प्रसंगावधान राखल्यामुळे आई व मुलाचा जीव वाचला.
जखमी महिलेची प्रकृती स्थिर
अग्रणी नदीच्या पुरातील पाण्यामध्ये आदळल्यामुळे शोभा माळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.