सांगलीत जिम व्यवस्थापकावर खुनी हल्ला, पूर्ववैमनस्यातून कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हा
By शरद जाधव | Updated: December 25, 2023 20:53 IST2023-12-25T20:53:18+5:302023-12-25T20:53:25+5:30
हल्ला झाल्यानंतर आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक गोळा झाले.

सांगलीत जिम व्यवस्थापकावर खुनी हल्ला, पूर्ववैमनस्यातून कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हा
सांगली: पूर्ववैमनस्यातून तिघांनी दुचाकी अडवून जिम व्यवस्थापक शंतून सुनील कलगुडगी (वय २२, आंबा चौक, यशवंतनगर, सांगली) याच्यावर चाकू आणि एडक्याने खुनी हल्ला केला. यशवंतनगर येथे वसंतदादा कुस्ती केंद्रासमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित टिपू ऊर्फ सोहेल जमादार, आसिफ जमादार आणि आदित्य चंद्रकांत भिसे (सर्व रा. वसंतदादा कुस्ती केंद्रासमोर, माळी वस्ती) यांच्यावर संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंतनू कलगुडगी हा जिम व्यवस्थापक म्हणून काम करतो. दुपारी त्यांच्या पत्नीस शंभर फुटी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सोडले. तेथून तो लक्ष्मी मंदिरमार्गे चिन्मय पार्ककडे निघाला होता. त्यावेळी तिघा संशयितांनी त्याला कुस्ती केंद्राजवळ अडवले. तीन महिन्यांपूर्वी रामकृष्णनगरमध्ये वैभव भिसे आणि दीपक जाधव यांच्यात भांडणे झाली होती. त्याच्या रागातून संशयित टिपू जमादार याने चाकूने शंतनूच्या छातीवर उजव्या बाजूस वार केला. तर, असिफ आणि आदित्य यांनी एडक्याने पाठीत दोन ठिकाणी वार करून गंभीर जखमी केले. अचानक झालेल्या हल्ल्यात शंतनू गंभीर जखमी झाला.
शंतनू याने हल्ला झाल्यानंतर आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक गोळा झाले. तेव्हा संशयित तेथून पसार झाले. जखमी शंतनू यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. संजयनगर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात येऊन त्याचा जबाब घेतला.