Sangli: कामावरून वाद, पलूसमध्ये बँकेच्या महिला कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:44 IST2025-07-05T16:44:06+5:302025-07-05T16:44:25+5:30
कार्यालयात मद्य प्राशन करून राडा घातला

Sangli: कामावरून वाद, पलूसमध्ये बँकेच्या महिला कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला
पलूस : पलूसमध्ये एका बँकेच्या महिला कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली. बँकेच्या सेवा केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांच्या वादाचे पर्यवसान खुनी हल्ल्यात होऊन या कार्यालयातील कर्मचारी विश्वजित पोपट पिसाळ (वय ३७, रा. विद्यानगर कॉलनी, पलूस) याने त्याच सेवा केंद्रात काम करणाऱ्या महिला कर्मचारी स्नेहल सुशांत कोले (वय ३५, रा. विद्यानगर काॅलनी (वय ३५) यांना चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. ही घटना ४ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद महिलेचे पती सुशांत अशोक कोले यांनी पलूस पोलिसात दिली आहे.
अधिक माहिती अशी, पलूस येथील स्नेहल कोले व विश्वजित पिसाळ हे दोघे एकाच कॉलनीत राहतात. दोघेही एका बँकेच्या सेवा केंद्रात नोकरीस आहेत. मागील अनेक दिवसांपासून दोघांच्यात कामाच्या कारणावरून वाद होत होते. मागील आठवड्यात या दोघांतील भांडणाची तक्रार वरिष्ठांना कळवली होती. यावर वरिष्ठांनी विश्वजित पिसाळ याला समज दिली होती. याचाच राग मनात धरून पिसाळ याने कार्यालयात मद्य प्राशन करून राडा घातला.
यावेळी दोघांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. याचे पर्यवसान टोकाच्या भांडणात झाले. पिसाळ याने चाकूने स्नेहलवर वार करून गंभीर जखमी केले. यात स्नेहल कोले यांचा कंठ व श्वासनलिका तुटली आहे. त्यांना उपचारासाठी सांगलीत दाखल केले होते. मात्र कंठावरील शस्त्रक्रिया ही सांगलीत होत नसल्याने त्यांना पुण्याच्या हाॅस्पिटलमध्ये हलवले. हा खुनी हल्ला नेमक्या कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचा तपास पलूस पोलिस करत आहेत.
अन् संशयिताचा कट उधळला
महिला कर्मचारी यांच्यावर खुनी हल्ला झाल्याने पलूस शहरात तणावाचे वातावरण होते. खुनी हल्ला नेमक्या कोणत्या कारणांनी झाला याचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. कार्यालयात महिलांची कामकाजासाठी मोठी गर्दी असताना हा प्रकार घडताना महिलांनी मोठा आरडाओरडा केला, यामुळे संशयिताचा कट उधळला.