सांगलीत खुनी हल्ल्यातील संशयिताचा निर्घृण खून, हल्लेखोर पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 12:25 IST2024-04-11T12:21:47+5:302024-04-11T12:25:45+5:30
पाणी-पाणी करत जीव गेला

सांगलीत खुनी हल्ल्यातील संशयिताचा निर्घृण खून, हल्लेखोर पसार
सांगली : खुनी हल्ला व युवतीच्या अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयित राहुल संजय साळुंखे (रा. १९, रा. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, सांगली) याचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला, तर त्याचा साथीदार तेजस प्रकाश करांडे (वय २१, रा. जामवाडी) हा जखमी झाला. रात्री सव्वाआठच्या सुमारास हा गणपती मंदिराच्या दारात हा प्रकार घडला. त्यामुळे भाविकांची पळापळ झाली. प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संशयितांना उशिरा ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत राहुल साळुंखे हा जामवाडीमध्ये राहतो. जुना बुधगाव रस्ता आणि जामवाडीतील मित्रांचा त्याचा ग्रुप आहे. जानेवारी महिन्यात दि. १८ रोजी कोयत्याचा धाक दाखवून सांगली कोल्हापूर रस्त्यावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे भर दुपारी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यावेळी मुलीच्या आईवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला होता.
सांगली शहर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुलीची सुटका केली होती. याप्रकरणी समर्थ भारत पवार (वय २२, रा. जुना बुधगाव रस्ता, राजीव गांधीनगर, सांगली), राहुल संजय साळुंखे (रा. १९, रा. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, सांगली), आदित्य गणेश पवार (वय २०, रा. पंत मंदिरनजीक, जामवाडी, सांगली), शुभम नामदेव पवार (वय २२ रा. श्रीनिवास अपार्टमेंट, गावभाग, सांगली) या टोळीला अटक केली होती.
खुनी हल्ला, अपहरणाच्या गुन्ह्यात अटक झालेला राहुल साळुंखे काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. सांगलीतील गणपती मंदिर परिसरात त्याचा अड्डा असायचा. बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास तो दुचाकीवरून गणपती मंदिरासमोर आला. दुचाकी लावल्यानंतर त्याला हल्लेखोरांनी घेरले. धारदार शस्त्राने त्याला भोसकल्यानंतर तो खाली पडला. त्याचा मित्र तेजस कारंडे याच्या डोक्यावर हल्ला केला. मंदिरासमोर स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भाविकांची गर्दी होती. याच गर्दीत हल्ला करून हल्लेखोर पसार झाले.
सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गर्दी हटवून पंचनामा केला. जखमी तेजस कारंडे याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिस पथकाला सूचना दिल्या.
पाणी-पाणी करत जीव गेला
गणपती मंदिराच्या दारात भोसकल्यानंतर जखमी राहुल समोरच असलेल्या नारळ-पेढे विक्री दुकानाच्या दारात तडफडत आला. पाणी-पाणी करतच त्याने दुकानाच्या समोर प्राण सोडला.
पूर्ववैमनस्यातून खुनाची शक्यता
जानेवारी महिन्यात मुलीचे अपहरण करताना आईवर खुनी हल्ला झाला होता. त्याच वादातून जामिनावर आलेल्या राहुलचा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेतले आहे.