ऊसतोड मुकादमाचा खून, तिघा संशयितांना अटक; जत तालुक्यात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 18:40 IST2022-02-25T18:40:30+5:302022-02-25T18:40:52+5:30
याबाबत अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र पैशाच्या देवाण घेवाणीवरूनच हा खून झाल्याचे समोर आले आहे.

ऊसतोड मुकादमाचा खून, तिघा संशयितांना अटक; जत तालुक्यात खळबळ
संख : जत तालुक्यातील करेवाडी तिकोंडी तेथील ऊसतोडणी मुकादम नामदेव लक्ष्मण तांबे (वय ४५ रा. तांबेवस्ती करेवाडी) यांच्या खून प्रकरणी तिघां संशयिताना उमदी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.२०) रात्री घडली होती. याबाबत अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र पैशाच्या देवाण घेवाणीवरूनच हा खून झाल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी मुकादम बबन हणमंत कोळेकर (वय ३६, रा.करेवाडी कोंतवबोबलाद), बाबू शंकर शेंडगे (३५, रा.तिकोंडी), ट्रक्टर चालक रामा आप्पाराया बिळूर (२७, रा तिकोंडी) या तिघांना अटक करून या गुन्ह्यात वापरलेली कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबत माहिती अशी की, मुकादम नामदेव तांबे हे साखर कारखान्यास ऊसतोडणी मजूर पुरविण्याचे काम करतात. त्यांच्या सोनहिरा साखर कारखान्यास तीन टोळ्या आहेत. रविवारी (दि.२०) रात्री करेवाडी कोंतवबोबलाद येथील ओळखीच्या लोकासमवेत पार्टीसाठी जातो म्हणून ते दुचाकी घेऊन गेले. मात्र ते घरी आलेच नाहीत.
अखेर त्याचा मृतदेह तांबेवाडी तिकोंडी रस्त्यावर घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर रस्त्याकडेला आढळून आला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. याबाबत अपघाती मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले. मात्र, मृत्यूबाबत कुटुंबाकडून संशय व्यक्त करण्यात आला होता.
मयत नामदेव तांबे व अरोपी बबन कोळेकर व इतर दोघे हे ऊसतोडणी कामगार पुरवण्याचे काम करीत होते. त्यांच्यातील पैशाचे व्यवहार परस्पर मिटवले म्हणून व पैशाच्या देवाण घेवाणीवरून व उसतोडणी टोळीतील कामगार परस्पर पळवतो म्हणून वाद झाला होता. यातून जबर मारहाण करत त्यांचा खून करण्यात आला. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार हे करीत आहेत.
सहा दिवसाची पोलीस कोठडी
संशयित तीन आरोपींना जत येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यंत सहा दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.