सीमा सुरक्षा दलात आता 'मुधोळ हाऊंड' श्वानांचा वापर; पंतप्रधानांनी 'मन की बात'मध्ये केले होते कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:10 IST2025-11-01T16:09:22+5:302025-11-01T16:10:41+5:30
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनीही आपल्या सैन्यात मुधोळ श्वानांचा वापर केला होता

सीमा सुरक्षा दलात आता 'मुधोळ हाऊंड' श्वानांचा वापर; पंतप्रधानांनी 'मन की बात'मध्ये केले होते कौतुक
संदीप परांजपे
शिरगुप्पी : कर्नाटकातील मुधोळ हाऊंड प्रजातीचा श्वान आणि उत्तर प्रदेशातील रामपूर येथील देशी जातीच्या एकूण १५० श्वानांना प्रथमच सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवर आणि नक्षलग्रस्त भागातील धोकादायक कमांडो ऑपरेशन्समध्ये या दोन्ही प्रजातींच्या श्वानांचा वापर करण्यात येणार आहे.
सन २०१८ मध्ये मध्य प्रदेशातील टेकानसूर येथील बीएसएफच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलात देशी प्रजातींचे श्वान तैनात करण्याची सूचना केली होती. त्यानुसार बीएसएफने कार्यवाही केली. मुधोळ तालुक्यातील रामपूर येथील मुधोळ हाउंडच्या श्वानांना प्रशिक्षण देऊन त्यांना दलात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.
मुधोळ श्वानांचे अस्तित्व प्राचीन काळापासून असल्याचे सांगितले जाते. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ परिसरात हा श्वान आढळून आला. इतिहासात संस्थानिकांच्या काळात त्यांचा वापर संरक्षणासाठी केला त्यचा. मुधोळ येथील मालोजीराव घोरपडे यांनी मुधोळ श्वानाला लोकप्रियता मिळवून दिली होती. सध्या तिम्मापुरा येथे एक श्वान प्रजनन केंद्र अस्तित्वात आहे.
मन की बातमध्येही प्रशंसा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मन की बातमध्ये मुधोळ श्वानाचे कौतुक केले होते. २०२० मध्ये मोदी यांनी `स्वावलंबी भारतात लोकांना घरात श्वान पाळायचे असतील तर मुधोळसह देशी जाती आणा` असे आवाहन केले होते. यानंतर, मुधोळ श्वानांची मागणी आणखी वाढली आहे.
राष्ट्राच्या सेवेत सुरुवातीपासून सहभाग
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनीही आपल्या सैन्यात मुधोळ श्वानांचा वापर केला होता. त्यांच्या काळात विविध लढाया, आक्रमणे व शिकारींमध्ये या श्वानांनी भाग घेतला होता. अलिकडच्या काळात भारतीय सैन्यातही मुधोळ हाउंड्सची सेवा सुरू आहे. सैन्यासोबतच मुधोळ हाउंड्सना सशस्त्र सीमा बल, राजस्थान, केंद्रीय राखीव पोलिस दल, बंगळुरू, सीआयएसएफ श्री हरिकोटा यासह विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
मुधोळ श्वानाची वैशिष्ट्ये
सडपातळ शरीरयष्टी, लांबट चेहरा आणि लांब पाय हे मुधोळ श्वानांचे खास वैशिष्ट्य आहे. डॉ. सुरेश होनप्पागोल नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना परिश्रमपूर्वक तयार केले.