मी जातो, तेथे ‘बाबरी’ हमखास पडते!; संजय राऊतांचा अनिल बाबरांना खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 17:17 IST2023-03-04T17:16:53+5:302023-03-04T17:17:29+5:30

आमच्याशी जो टक्कर देईल, तो मातीतच जाईल.

MP Sanjay Raut attack on MLA Anil Babar | मी जातो, तेथे ‘बाबरी’ हमखास पडते!; संजय राऊतांचा अनिल बाबरांना खोचक टोला 

मी जातो, तेथे ‘बाबरी’ हमखास पडते!; संजय राऊतांचा अनिल बाबरांना खोचक टोला 

विटा : शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून तुम्हाला निवडून आणले आणि तुम्ही ५० खोक्यात विकले गेलात, हा प्रकार विट्याची जनता विसरणार नाही, पण खोकेवाले आमदार आता अपात्रच होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या खोकेवाल्या आमदारांना घरी बसवायच्या तयारीत जनता आहे. मी जेथे जातो, तेथे ‘बाबरी’ हमखास पडते, असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार अनिल बाबर यांना लगावला.

खा. राऊत यांच्या शुक्रवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर विटा मार्गे साताऱ्याकडे जात असताना त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या हजारो शिवसैनिक कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभूते, उपजिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे, राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील, ॲड. संदीप मुळीक, अविनाश चोथे, शंकर मोहिते, संग्राम माने उपस्थित होते.

आ. बाबर यांचे नाव न घेता राऊत म्हणाले, येथील खोकेवाले आमदारांच्या उचापती मला सांगण्यात आल्या. गावागावांत पाणी कसे बंद केले, दादागिरी व दहशत कशी सुरू आहे, याची माहिती मला मिळाली. परंतु, त्यांना मी सांगू इच्छितो की, सामना शिवसैनिकांशी आहे, हे लक्षात ठेवा. आता शिवसेनेबरोबर कॉँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडी आहे. आमच्याशी जो टक्कर देईल, तो मातीतच जाईल.

Web Title: MP Sanjay Raut attack on MLA Anil Babar