Sangli: खड्डा चुकवताना दुचाकी घसरून माय-लेक ठार, नातेवाईकांना भेटायला जाताना काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 18:47 IST2025-01-04T18:46:54+5:302025-01-04T18:47:34+5:30
नाताळच्या सुटीसाठी आली होती माहेरी

Sangli: खड्डा चुकवताना दुचाकी घसरून माय-लेक ठार, नातेवाईकांना भेटायला जाताना काळाचा घाला
इस्लामपूर : बहे (ता. वाळवा) गावच्या हद्दीत बहे-नरसिंहपूर रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात निघालेली दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवरील आई आणि ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी झाला.
काजल चेतनसिंग हजारे (वय २८) आणि देवांश चेतनसिंग हजारे (वय ५, दोघे रा. कब्बुर, ता. चिकोडी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर दुचाकी चालवणारे चेतनसिंग विठ्ठलसिंग हजारे (वय ३२) हे जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत अनंत रामसिंग रजपूत (रा. इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतनसिंग हजारे याच्याविरूद्ध पत्नी आणि मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
काजल ही आपला मुलगा देवांश याच्यासह नाताळच्या सुटीसाठी इस्लामपूर येथील माहेरी आली होती. चिकोडी येथील गावी परतण्यापूर्वी किल्ले मच्छिंगड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी पती चेतनसिंग यांच्यासोबत दुचाकीवरून (एमएच १० बीडब्ल्यू ६०६) सकाळी तिघे निघाले होते. बहे ते नरसिंगपूर दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरली. त्यामुळे काजल आणि तिचा मुलगा देवांश हे रस्त्यावर पडून डोक्यास गंभीर मार लागून जखमी झाले. काजल हजारे यांना शहरातील खासगी रूग्णालयात तर मुलगा देवांश याला कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला. या अपघाताचा पोलिस तपास करीत आहेत.