हृदय हेलावणारे चित्र, आईच्या मृत्यूनंतर पिलाला दिली माकडिणींनी माया; सांगलीतील बांबवडे येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:21 IST2025-07-08T16:20:58+5:302025-07-08T16:21:23+5:30

दूध पाजून पिलाचा केला सहकाऱ्यांनी सांभाळ

monkeys caressed their cub after the death of their mother incident in Bambawade, Sangli | हृदय हेलावणारे चित्र, आईच्या मृत्यूनंतर पिलाला दिली माकडिणींनी माया; सांगलीतील बांबवडे येथील घटना 

हृदय हेलावणारे चित्र, आईच्या मृत्यूनंतर पिलाला दिली माकडिणींनी माया; सांगलीतील बांबवडे येथील घटना 

शिराळा : एकीकडे माणूस माणूसपण हरवत आहे, मात्र दुसरीकडे माकडांच्यात आपलेपण, सहकार्य केल्याची घटना पाहायला मिळाली. बांबवडे (ता. शिराळा) येथे वाहनाची धडक माकडीणीसह तिच्या पिलाला बसली. यामध्ये माकडिणीचा मृत्यू झाला, मात्र पाच-सहा दिवसांच्या पिलाला त्याच कळपातील माकडिणीने दूध पाजून तिला सांभाळण्यासाठी घेऊन गेली. आज माणूसकी हरवत असताना मुक्या प्राण्यांच्यात मात्र ममता, प्रेम आजही पहावयास मिळते.

शनिवार दि. ५ जुलै रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान वाटेगावचे राजेश साळुंखे यांचा फोन आला की एक वानर बांबवडे फाट्यावर पिलासमवेत गाडीला धडकले आहे. गाडीला धडकल्यानंतर कुत्र्यांनीही त्याच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर रोकडे वस्तीवर कडबा व भिंतीच्या मध्ये सहा इंचाची फट होती. कुत्र्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी या वानराने पिलासह या फटीचा संरक्षणासाठी उपयोग केला. गाडीच्या धडकेत वानराला डोक्याला गंभीर इजा दिसत होती. त्यामुळे पिलाच्या जिवालाही धोका होता.

याबाबत तातडीने वनविभागाला कळवून वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, रेस्क्यू टीमचे सदस्य संतोष कदम, प्राणिमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड , गणेश निकम यांनी वानराला सुखरूप रेस्क्यू करून उपचार केले. मात्र, यामधे माकडिणीचा मृत्यू झाला.

यानंतर या पिलाला शिराळा वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. याठिकाणी आईची ऊब जाणवेल अशा कपड्यांमध्ये या पिलाला ठेवले. दर दोन तासांनी दूध पाजण्यात येत होते. त्याची वैद्यकीय तपासणीही केली. रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान या परिसरात माकडांचा कळप गोळा झाला. या सर्वांनी आरडाओरडा चालू केला. यावेळी या पिलाला तेथील एका झाडाखाली कपड्यांवर ठेवले. यावेळी एक माकडीण त्याठिकाणी खाली आली. त्या पिलाला जवळ घेऊन घट्ट छातीला कवटाळले आणि त्या पिलाला झाडावर घेऊन गेली.

हृदय हेलावणारे चित्र

माकडांच्या कळपातील इतर माकडिणींनी या पिलाला काही दुखापत वगैरे झाली का हे न्याहाळून पाहिले. त्यातील एका माकडिणीला यासारखेच एक पिल्लू होते. त्या माकडिणीने या पिलाला जवळ घेऊन त्याला दूध पाजले. आईचा मृत्यू झाला, मात्र इतर त्यांच्या कळपातील सहकाऱ्यांनी या पिलाला दिलेली माया हे दृश्य हृदय हेलावणारे होते.

Web Title: monkeys caressed their cub after the death of their mother incident in Bambawade, Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.