Sangli: भाषणात बोललेले किती खरे, हे तुम्हीच ठरवा; सुरेश खाडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर उभे केले प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:14 IST2025-10-31T19:12:13+5:302025-10-31T19:14:20+5:30
अद्याप जागावाटप ठरलं नाही : एकनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय देणार

Sangli: भाषणात बोललेले किती खरे, हे तुम्हीच ठरवा; सुरेश खाडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर उभे केले प्रश्नचिन्ह
मिरज : पालकमंत्री पक्षाच्या बैठकीत महापालिका उमेदवारांबाबत बोलत नाहीत. केवळ भाषणात बोललेले किती खरे, हे तुम्हीच ठरवा, असे सांगत आमदार सुरेश खाडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महायुतीमार्फत लढवल्या जाणार आहेत. त्यात भाजपच्या निष्ठावंतांना न्याय मिळेलच, असा दावा आमदार खाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पक्षातील निष्ठावंतांना महापालिकेत उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आ. खाडे यांनीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील केवळ भाषणात बोलत असल्याने एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी त्याची चिंता करू नये, असे सांगितले. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीत कोणतेही जागा वाटप ठरलेले नाही. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघे याचा निर्णय घेतील. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ जो निर्णय देतील, त्यानुसार निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे, त्यांनी सांगितले. 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आमच्या बैठकीत बोलत नाहीत, पण भाषणात महापालिका उमेदवारांबाबत बोलतात. त्यामुळे भाषणात बोललेलं किती खरं आणि किती खोटं हे तुम्हीच ठरवा, असेही वक्तव्य आमदार खाडे यांनी केले. ४२ नगरसेवक भाजपचे असल्याने पालकमंत्र्यांनी भाजपच्या ४२ जागा व सांगलीत २२ जागा सांगितले. जयश्री पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी असे सांगितले असावे.
मात्र, कोणत्याही उमेदवाराचे नाव त्यांनी जाहीर केलेले नाही. पक्षातील ज्येष्ठ, श्रेष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा निश्चित विचार होणार आहे. निवडणुकीसाठी आघाड्या अनेकजण काढतात. पण, ते सर्वजण पक्षातूनच लढणार आहेत. इच्छुकांचे अर्ज सोमवारी स्वीकारणार व पुढे वरिष्ठांच्या आदेशाने निर्णय होईल. असेही आमदार खाडे यांनी यावेळी सांगितले.
सात शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान वाटप
स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत मिरज तालुक्यातील सात शेतकऱ्यांच्या वारसांना एकूण १३ लाख रुपयांचे धनादेश आमदार खाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार खाडे यांनी सांगितले की, मिरज शहरात सात प्रभागांत गत आर्थिक वर्षात सुमारे २५ कोटीची विविध विकासकामे करण्यात आली. या आर्थिक वर्षात प्रभागनिहाय १० कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या कामांना लवकरच मंजुरी मिळणार आहे. शहरासोबत तालुक्यात ४५ गावांत एकूण १०९ कोटी रुपये खर्च करून विकासकामे करण्यात आली. या आर्थिक वर्षात २७ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी गावनिहाय कामासाठी प्रस्तावित आहे.