Sangli Politics: काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षाच्या वादात जयंतरावांची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:18 IST2025-12-17T18:16:14+5:302025-12-17T18:18:06+5:30
तर्क-वितर्क सुरू

Sangli Politics: काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षाच्या वादात जयंतरावांची एंट्री
सांगली : काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीतील वादात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी एंट्री केली आहे. मंगळवारी आ. जयंत पाटील यांनी माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांना भेटीसाठी बोलावले होते. दोघांमध्ये एक तास चर्चा झाली.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने महाविकास आघाडी करण्याची घोषणा केली आहे. सध्या काँग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्षपदावरून वाद सुरू आहे. या पदासाठी माजी नगरसेवक मंगेश चव्हाण व राजेश नाईक यांचे नाव पुढे येत आहे.
पण, चव्हाण यांना डावलून राजेश नाईक यांची निवड करण्याबाबचे पत्र दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाराज असलेले चव्हाण वेगळ्या मोर्चेबांधणीच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर आ. जयंत पाटील व चव्हाण यांच्यात मंगळवारी तासभर चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज उपस्थित होते.
तर्क-वितर्क सुरू
काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांची काही दिवसांपूर्वी मंगेश चव्हाण यांच्याशी चर्चा झालेली होती. त्यानंतर पुन्हा जयंत पाटील यांची भेट झाल्याने राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.